जोरदार वादळी वाऱ्याने जि. प. शाळेच्या तीन खोल्यांवरील छत गेले उडून
कोल्हापूरः (घुणकी)
जोरदार वादळी वाऱ्यात किणी (ता हातकणंगले) येथील जिल्हा परिषदेच्या प्रताप विद्यामंदिर शाळेच्या तीन खोल्यांवरील व परीसरातील घरावरील पत्र्याचे संपूर्ण छत उडून गेले, तर शाळेच्या मैदानावर लावलेल्या ऊसाच्या रिकाम्या ट्रॉल्या उलटल्या. अनेक ठिकाणी विजेचे खांब मोडून तारा तुटल्या आहेत. तर एक एकरातील केळीची बाग भुईसपाट झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास किणी येथे जोरदार वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्याला मोठ्या प्रमाणात वेग असल्याने जिल्हा परिषदेच्या प्रताप विद्यामंदिर शाळेच्या तीन खोल्या वरील पत्रे उडुन गेल्याने कॉम्प्युटर, प्रिंटर, एल ए डी टीव्ही, साउंड सिस्टीम, सीसीटीव्ही, सह विजेच्या नुकतेच बसविण्यात आलेले सोलर पॅनेल खराब होऊन सुमारे पाच लाख रुपये चे नुकसान झाले आहे.

याचबरोबर माळवाडी वरील हैदर महाबरी, याच्या सात खोल्यावरील सिमेंट पत्र्याचे छत उडुन गेले आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने शाळेच्या ग्राऊंडवर लावलेल्या ऊसाच्या रिकाम्या ट्रॉल्या चक्क पलटी झाल्या होत्या. दोन विद्युत खांब मोडून विजेचे तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. हेमंत पाटील यांची एक एकरातील केळीची बाग भुईसपाट झाल्याने चार ते पाच लाख रूपये नुकसान झाले आहे वठार मंडल अधिकारी अमित लाड. गावकामगार तलाठी ए एस मोमीन ग्रामविकास आधिकार धनाजी शिंदे, उपसरपंच अशोक माळी यांनी पंचनामा केला.