टोनबो इमेजिंग समभागाची दमदार सुरुवात
वृत्तसंस्था, मुंबई
टोनबो इमेजिंग इंडियाच्या समभागाने शेअरबाजारात 23 ऑक्टोबर रोजी दमदार तेजीसह शुभारंभ केल्याचे पाहायला मिळाले. समभाग 66 टक्के तेजीसह कार्यरत झाल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले. या आयपीओला गुंतवणूकदारांचा दमदार प्रतिसादही प्राप्त झाला होता. कंपनीचा समभाग 66 टक्के तेजीसह 1161 रुपयांवर एनएसईवर खुला झाला होता.
आयपीओची इशु किंमत 700 रुपये इतकी होती. कंपनी या आयपीओतून 852 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला झाला आणि तो जवळपास 132 पट सबस्क्राइब झाला. पात्रताधारक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 293 पट, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार 156 पट, रिटेल गुंतवणूकदारांनी 31 पट व कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी 54 पट आयपीओ सबस्क्राइब केल्याचे समजते.
बाजारमूल्य, काय करते कंपनी
कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 6 हजार कोटीपेक्षा जास्त आहे. आयपीओअंतर्गत 1.22 कोटी समभाग हे ऑफर फॉर सेलअंतर्गत सादर करण्यात आले होते. ग्लोबल डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स ओरीजनल सुटेभाग निर्माती कंपनी म्हणून टोनबोची ओळख आहे. थर्मल इमेजिंग सिस्टम्स प्रणाली, वेपन साइटस, मिसाइल सीकर्स, फायर कंट्रोल सिस्टम, मिसाइल गायडन्स सिस्टम्स, टारगेटिंग सिस्टम्स व हँडहेल्ड थर्मल इमेजिंग उपकरणे कंपनी तयार करते. अरविंद केंडांगी लक्ष्मीकुमार, अंकित कुमार, सेसीलीया डिसुझा, विनीमय अॅडव्हायजरी एलएलपी हे कंपनीचे प्रवर्तक आहेत. एप्रिल ते जून 2026 अवधीत कंपनीने 37 कोटीचा महसूल प्राप्त केला होता. तर याच अवधीत 17 कोटीचा तोटा कंपनीने सहन केला आहे.
