इलेक्ट्रिक वाहनांची मजबूत विक्री
मार्चमध्ये 1,97,000 हून वाहनांची विक्री
नवी दिल्ली :
आर्थिक वर्ष 2024मध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मजबूत विक्री झाल्याचे समोर आले आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ सातत्याने वाढत आहे. जर आपण यासंदर्भातील आकडेवारी पाहिली तर भारतीय इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) उद्योगाने आर्थिक वर्ष 2024 मध्ये विविध प्रकारच्या वाहनांची रेकॉर्डब्रेक विक्री केली आहे. या कालावधीत 41 टक्के वाढीसह एकूण 1.66 दशलक्ष ईव्ही विक्री करण्यात विविध कंपन्यांना यश प्राप्त झाले आहे.
एकट्या मार्चमध्ये 1,97,000 हून अधिक इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीसह हा एक नवीन विक्रम बनला आहे. तज्ञांच्या मते, ईव्ही विक्री वाढण्यामागील एक कारण म्हणजे फेम-2 सबसिडी योजना, ज्याचा ग्राहकांनी फायदा घेतला.
या वर्षी जुलै अखेरपर्यंत इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या खरेदीला पाठिंबा देणे सुरू ठेवण्यासाठी सरकारने 500 कोटी रुपयांच्या बजेटसह इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम 2024 सुरू केली आहे.
सरकारच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार एप्रिल 2023 ते मार्च 2024 पर्यंत भारतात 16,65,270 ईव्ही खरेदी करण्यात आल्या, याचा अर्थ दररोज सरासरी 4,562 ईव्ही विकल्या गेल्या. गेल्या वर्षी हाच आकडा 3,242 होता. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतीही चालकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे आकर्षित करत असल्याचे मानले जात आहे.
ईव्हीच्या या प्रचंड विक्रीत दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचा मोठा वाटा होता. सर्व ईव्ही विक्रीत दुचाकी वाहनांचा वाटा 56 टक्के आहे, ज्यात वार्षिक 29 टक्के वाढ झाली आहे, तर तीनचाकी वाहनांमध्ये 57 टक्के वाढ झाली आहे.