जियो आयपीओला दमदार प्रतिसाद
वृत्तसंस्था, मुंबई
जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचा आयपीओ 19 ऑक्टोबर रोजी अँकर इन्व्हेस्टर्स अर्थात मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी खुला झाला होता, त्याच्या अँकर बुकला आतापर्यंत 30 पटांहून अधिक सबक्रिप्शन प्राप्त झाले आहे.
आयपीओमध्ये एकूण 8,110 कोटी रुपयांचे शेअर्स अँकर इन्व्हेस्टर्ससाठी राखीव ठेवले आहेत. त्याच्या तुलनेत अँकर इन्व्हेस्टर्सनी सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांच्या बोली लावल्या आहेत. कोणत्याही भारतीय आयपीओकरीता ही आतापर्यंतची सर्वात मोठी संस्थात्मक बोली असल्याचे समजते. या अँकर बुकमध्ये जगातील सर्वात मोठे अॅसेट मॅनेजर्स, सार्वभौम संपत्ती निधी, भारतातील प्रमुख म्युच्युअल फंड्स, विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्स यांनी सहभाग घेतला आहे.
10 म्युच्युअल फंड हाऊस उत्सुक
देशातील टॉप 10 म्युच्युअल फंड हाऊसेसनी देखील गुंतवणूक करण्यात रस घेतला आहे. अ यामध्ये एसबीआय म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय प्रुडेंशियल म्युच्युअल फंड, एचडीएफसी म्युच्युअल फंड, आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड, निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड आणि कोटक महिंद्रा म्युच्युअल फंड यांचा प्रामुख्याने समावेश आहे. तसेच लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ, एसबीआय पेन्शन, एचडीएफसी पेन्शन आणि आयसीआयसीआय प्रूडेंशियल या दिग्गजांनीही सहभाग घेतला आहे. याशिवाय टेक्नॉलॉजी-आधारित ग्लोबल फंड्स आणि मोठ्या फॅमिली ऑफिसेसनीही यात गुंतवणूक करण्यात रस घेतला आहे.
फॉरेन लॉन्ग-ओन्ली फंड्सची भूमिका
जिओच्या या अँकर बुकमध्ये बहुतांश मागणी फॉरेन लॉन्ग-ओन्ली फंड्स, सार्वभौम संपत्ती फंड्स आणि पेन्शन फंड्सकडून आल्याचे सांगितले जात आहे. भारतात गुंतवणूक करणारा जवळपास प्रत्येक मोठा फंड या इश्यूमध्ये सहभागी होत आहे आणि दुसरे म्हणजे कोणताही प्रमुख फंड यापासून दूर राहिलेला नसल्याचे स्पष्ट होत आहे.
