For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शुक्रवारी अखेरच्या दिवशी शेअर बाजारात जोरदार तेजी

06:58 AM Jul 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
शुक्रवारी अखेरच्या दिवशी शेअर बाजारात जोरदार तेजी
Advertisement

सेन्सेक्स 964 अंकांनी तर निफ्टी 261 अंकांनी तेजीत, आयटी आणि बँकिंग समभागांची खरेदी

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

शुक्रवारी आठवड्याच्या अखेरच्या दिवशी बँकिंग आणि आयटी समभागांच्या दमदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार मोठी उसळी घेत बंद झाला. सेन्सेक्स 964 तर निफ्टी 261 अंकांनी चढत बंद झाला.

Advertisement

शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 964 अंकांनी वाढत 78151 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकाने देखील 261 अंकांची वाढ दर्शवत 24334 च्या स्तरावर बंद होण्यात समाधान मानले. निफ्टी बँक निर्देशांक कमालिची तेजी राखून होता. हा निर्देशांक 939 अंकांची उसळी घेत 58521 अंकांवर बंद झाला. आयटी निर्देशांकाची कामगिरी सुद्धा शुक्रवारी चमकदार पहायला मिळाली. 504 अंकांच्या वाढीसोबत 29226 च्या स्तरावर आयटी निर्देशांक दिवसअखेर बंद झाला होता. बँकिंग क्षेत्रातल्या समभागांनी निकालाआधी तेजी राखली होती. मोठ्या प्रमाणात खरेदीदारांनी बँकांचे समभाग घेणे पसंत केले.

बाजारातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक यांचे योगदान बाजारासाठी महत्त्वाचे ठरले. टेक महिंद्राचे समभाग पहिल्या तिमाहीतील निकालानंतर 5 टक्के वाढले. निफ्टीतील सर्वाधिक वाढीत टेक महिंद्राचा समावेश होता. याचप्रमाणे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा समाभागसुद्धा निकालानंतर 3 टक्के वाढताना दिसला. तर खराब निकालाच्या पार्श्वभूमीवर आयटी क्षेत्रातील कंपनी विप्रोचा समभाग 1 टक्का खाली आला.

दुसरीकडे रिअल इस्टेट क्षेत्रातील समभागांची देखील गुंतवणूकदारांनी खरेदी केली. या क्षेत्रातील डीएलएफ आणि प्रेस्टीज इस्टेट यांचे समभाग प्रत्येकी 3 टक्के वाढत बंद झाले. भारत फोर्जचा समभाग 4 टक्के वाढला होता. पॉलिकॅबचा समभाग मात्र 4 टक्के घसरणीत राहिला. बीएसईचा समभाग 3 टक्के कमकुवत होत बंद झाला. शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी या दोघांनी आठवड्यात 0.5 टक्के तेजी अनुभवली आहे. टीसीएस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक्नॉलॉजी, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक आणि आयसीआयसीआय बँक हे निफ्टीतले सर्वाधिक वाढीत राहणारे समभाग राहिले. तर लार्सन टुब्रो, बजाज फिनसर्व्ह, ग्रासीम आणि टाटा स्टील यांची कामगिरी शेअरबाजारात निराशादायक होती. मिडकॅप निर्देशांकात कल्याण ज्वेलर्स, एबीबी, एसबीआय कार्ड, डिक्सन टेक्नॉलॉजी, भेल आणि डिव्हीज लॅब्रोटरीज यांचे समभाग तेजीत राहिले होते.

Advertisement
Tags :

.