चीनला प्रत्युत्तराची जोरदार तयारी !
भारताला चीन व पाकिस्तान असे दोन पारंपरिक शत्रू शेजारी म्हणून लाभलेले असताना अन् खास करून ‘ड्रॅगन’च्या हिंदी महासागरावर वर्चस्वासाठीच्या हालचाली वाढत चाललेल्या असताना आपण संरक्षणदृष्ट्या सदोदित सज्ज राहणं अत्यावश्यक...त्यादृष्टीनं नरेंद्र मोदी सरकारनं नुकताच अमेरिकेशी घातक ‘प्रिडेटर ड्रोन्स’साठी केलेला करार अन् पाणबुड्यांची ताकद वाढविण्याचे घेतलेले निर्णय ही खूप खूप महत्त्वाची पावलं...
पंतप्रधानांच्या ‘कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी’नं (सीसीएस) हिरवा कंदील दाखविल्यानंतर भारतानं अत्यंत घातक ‘एमक्यू-9 बी प्रिडेटर ड्रोन्स’साठीच्या अमेरिकेबरोबरच्या करारावर स्वाक्षरी केलीय...‘हंटर-किलर’ म्हणून जगभरात ओळखल्या जाणाऱ्या आणि शत्रूच्या लक्ष्यांची स्वत:च गुपचूपरीत्या माहिती गोळा करून गरज भासल्यास त्यांना उद्धवस्त करण्याची क्षमता असलेल्या 31 ‘ड्रोन्स’साठी भारताला तब्बल 28 हजार कोटी रुपये वा 3.3 अब्ज डॉलर्स मोजावे लागतील. शिवाय 4 हजार 350 कोटी रुपये उत्पादक ‘जनरल अॅटोमिक्स’ला नवी दिल्लीत त्यांची देखभाल नि दुरुस्तीसाठी केंद्र उभारण्याकरिता देण्यात येतील. जोडीला सदर कंपनी भारतात गुंतवणूक करणार असून 34 टक्के सुट्या भागांची खरेदी भारतीय आस्थापनांकडून करण्यात येईल. ‘जनरल अॅटोमिक्स’नं ‘डीआरडीओ’ला ‘हाय-अॅल्टिट्यूड ड्रोन्स’ विकसित करण्याकामी सल्ला देण्याचंही मान्य केलंय...
या कराराच्या अंतर्गत पहिलं ‘एमक्यू-9 बी हाय-अॅल्टिट्यूड लाँग-एंड्युरन्स ड्रोन’ (समुद्रसपाटीपासून 40 हजार फुटांवर सतत 40 तास उडण्याची क्षमता) जानेवारी, 2029 पर्यंत भारताच्या ताफ्यात दाखल होईल, तर शिल्लक 30 ‘ड्रोन्स’ ऑक्टोबर, 2030 पर्यंत मिळतील. हे ‘ड्रोन’ महाशक्तीकडून प्राप्त करणं शक्य झाल्यानं आम्हाला ‘इंटेलिजन्स’, ‘सर्व्हेलन्स’ वगैरे क्षेत्रांमध्ये उ•ाण करणं, वेगानं पुढं चाललेल्या चीनशी स्पर्धा करणं शक्य होईल...यापूर्वी सप्टेंबर, 2020 मध्ये भारतानं ‘जनरल अॅटोमिक्स’कडून दोन ड्रोन्स लीजवर मिळविली होती. परंतु त्यात हत्यारांचा समावेश नव्हता. त्यापैकी एक सप्टेंबर महिन्यात अपघातामुळं उद्धवस्त झालंय...
त्या दोन्ही ड्रोन्सनी नवी दिल्लीला हिंदी महासागरात हेरगिरी करणाऱ्या चीनच्या जहाजांवर लक्ष ठेवण्याच्या बाबतीत फार मोठी मदत केलीय. शिवाय तब्बल 3 हजार 488 किलोमीटर्स इतक्या लांबीच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या परिसरातील ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या हालचालींवर देखील त्यानं नजर ठेवली...दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ‘डीआरडीओला’ला अजूनपर्यंत लांब पल्ल्याचं पाणबुड्यांवर हल्ला करण्यास सक्षम असं ‘हंटर-किलर ड्रोन’ विकसित करणं शक्य झालेलं नाहीये. भारताच्या सामर्थ्यात भर घालण्यासाठी त्याची अत्यंत गरज होती...अमेरिकेकडून मिळणार असलेल्या 31 पैकी 15 ‘एनक्यू-9 बी सी गार्डियन्स’चा नौदलात, तर भूदल व हवाई दलात प्रत्येकी 8 ‘स्काय गार्डियन्स’चा समावेश करण्यात येईल...
विशेष म्हणजे भारताला मिळणाऱ्या सर्व ‘ड्रोन्स’मध्ये ‘हेलफायर’ क्षेपणास्त्र, ‘जीबीयू-39 बी प्रिसिजन-गायडेड ग्लाईड बॉम्ब्स’ आणि अन्य हत्यारं यांचा समावेश असेल...भारतीय अधिकाऱ्यांनी ‘प्रिडेटर’ची किंमत महाग असल्याच्या टीकाकारांच्या टिप्पणीला उत्तर देताना म्हटलंय की, ‘प्रिडेटर’ वा ‘रिपर ड्रोन्स’नी अफगाणिस्तानसारख्या देशात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलीय. पण विश्लेषकांच्या मते, त्यांना तिथं घणाघाती उत्तर देण्यासाठी जमिनीवरून आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली नसल्यानं त्याचं स्वरूप अधिक घातक भासलं. अधिकाऱ्यांनुसार, नवी दिल्लीला मिळणारी ‘एमक्यू-9 बी’ ही या गटातील नवी आवृत्ती असून त्यातील शस्त्रांत क्षमता आहे ती लांब पल्ल्यावरून शत्रूच्या ‘टार्गेट’ला उद्धवस्त करण्याची...भारतही त्या ‘ड्रोन्स’मध्ये नौदलाची लहान पल्ल्याची जहाजविरोधी क्षेपणास्त्रं बसविणार असून त्यांची निर्मिती ‘डीआरडीओ’नं केलीय...
दोन ‘एसएसएन’ पाणबुड्यांस हिरवा कंदील...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘सीसीएस’नं ‘प्रोजेक्ट-77’च्या अंतर्गत अणुऊर्जेवर चालणाऱ्या व हल्ला करण्याची क्षमता असलेल्या दोन पाणबुड्यांची निर्मिती करण्यासाठी 40 हजार कोटी रुपये खर्चाला देखील मान्यता दिलीय. त्यांना नौदलाच्या भाषेत ‘एसएसएन’ म्हणतात...त्यात पारंपरिक क्षेपणास्त्रं, टॉर्पेडो नि अन्य हत्यारं असतील अन् त्यांची निर्मिती करण्यात येईल ती विशाखापट्टणम इथं. ‘एसएसएन’ 190 मेगावॅट ‘प्रेशराईज्ड लाईट-वॉटर रिएक्टर’वर चालणार आणि त्यांचं वजन असेल ते 10 हजार टन एवढं. त्यातील 75 टक्के सुट्या भागांची भारतातच निर्मिती केली जाणार असून एखाद्या परराष्ट्राचा सल्ला घेण्यात येईल तो आराखडा तयार करताना...
? पहिली ‘एसएसएन’ देशाला मिळेल ती येऊ घातलेल्या 10 ते 12 वर्षांत. सुरुवातीच्या निर्णयानुसार, अशा प्रकारच्या सहा पाणबुड्या निर्माण करण्याची योजना होती. पण अन्य चारांच्या निर्मितीसंदर्भात निर्णय भविष्यात घेण्यात येईल...
? 30 नॉट्सच्या वेगानं जाण्याची त्यांची क्षमता असून शत्रूला जराही कल्पना न देता या बिगरआण्विक पाणबुड्यांना बरीचशी कामं करणं शक्य आहे. जहाजविरोधी क्षेपणास्त्रं व टॉर्पेडोशिवाय त्यांच्यावर जमिनीवर मारा करणारी क्रूझ’ क्षेपणास्त्रं बसविण्यात येतील...
? ‘एसएसएन’ची ताकद दाखविण्यासाठी एकच उदाहरण पुरेसं नि ते म्हणजे अमेरिका, इंग्लंड नि ऑस्ट्रेलिया यांनी केलेल्या ‘ऑकस’ लष्करी करारात ऑस्ट्रेलियानं तब्बल आठ ‘एसएसएन’ची मागणी केलीय...
? भारताला चीन (पदरी एकूण 59 पाणबुड्या) व पाकिस्तान यांना तोंड देण्याच्या दृष्टीनं आणखी चार आण्विक पाणबुड्या, सहा ‘न्युकिलअर पॉवर्ड अॅटेक सबमरिन्स’ आणि 18 ‘डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यां’ची गरज भासणार...
भारतीय पाणबुड्यांचा ताफा...
अणुशक्तीवरील तिसरी पाणबुडी सज्ज...
भारत अणुशक्तीवर चालणाऱ्या नि बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा मारा करण्यास सक्षम असलेल्या तिसऱ्या पाणबुडीचं (एसएसबीएन) दर्शन जगाला घडवेल ते येऊ घातलेल्या सहा महिन्यांत. या पार्श्वभूमीवर भारताच्या समुद्रातील आण्विक हत्यारांच्या ‘ट्रायाड’ची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल...‘आयएनएस अरिघात’चा ‘स्ट्रेटॅजिक फोर्सेस कमांड’मध्ये यंदा 29 ऑगस्ट या दिवशी समावेश करण्यात आला. तिसऱ्या ‘एसएसबीएन’च्या चाचण्या सध्या सुरू असून तिचं नाव ‘आयएनएस अरिधमन’ असं ठेवण्यात येईल...
? ‘आयएनएस अरिहंत’ व ‘आयएनएस अरिघात’ यांच्याहून ‘आयएनएस अरिधमन’चा आकार थोडा मोठा (125 मीटर लांब आणि 7 हजार टन वजन) अन् तिच्यात ताकद असेल ती जास्त लांब पल्ल्याची आण्विक क्षेपणास्त्रं वाहून नेण्याची...
? ‘आयएनएस अरिघात’मध्ये ‘के-4’ क्षेपणास्त्रं बसविण्यात आलेली असून त्यांची क्षमता 3 हजार किलोमीटर्सहून अधिक अंतरावर मारा करण्याची. मात्र पहिल्या ‘आयएनएस अरिहंत’वर तैनात केलेल्या ‘के-15’ना 750 किलोमीटर्स अंतरावरील टार्गेटला उद्धवस्त करणं जमतंय...
? पाणबुड्यांच्या विश्वातील चीनच्या वाढत्या शक्तीला उत्तर देण्याचा योग्य मार्ग म्हणजे ‘एसएसबीएन’. कारण त्या जास्त सुरक्षित, टिकाऊ अन् रडारला चकवा देऊ शकणाऱ्या असतात...
? 1990 मध्ये जन्मलेल्या 90 हजार कोटी रुपयांच्या अॅडव्हान्स्ड टेक्नोलॉजी प्रोजेक्टच्या अंतर्गत चार पाणबुड्या बांधण्यात आलेल्या असून अमेरिका, चीन आणि रशिया यांच्याशी तुलना केल्यास त्यांचा आकार सुमारे 50 टक्के कमी.,..
? भविष्यात 13 हजार टनांच्या 190 मेगावॅट रिएक्टरवर चालणाऱ्या आणि ‘के-5’ (पल्ला 5 हजार किलोमीटर्स) व ‘के-6’ (पल्ला 6 हजार किलोमीटर्स) क्षेपणास्त्रं तैनात केलेल्या पाणबुड्यांची निर्मिती करण्याचा संकल्प सोडण्यात आलाय...
‘आयएनएस अरिघात’ची वैशिष्ट्यां...
? वजन 6 हजार टन...
? लांबी 111.16 मीटर्स, तर रुंदी 11 मीटर्स...
? पाण्यातून प्रति तास 44 किलोमीटर या वेगानं प्रवास करण्याची क्षमता...
? 3 हजार किलोमीटर्सहून अधिक अंतरात मारा करू शकणारी ‘के-4’ तैनात...
? 83 मेगावॅट प्रेशराईज्ड लाईट वॉटर रिएक्टरची जोड...
? अनेक महिने पाण्याखाली राहण्याची ताकद...
संकलन : राजू प्रभू