‘टीम इंडिया’च्या प्रमुख खेळाडूंकडून जोरदार सराव
वृत्तसंस्था/ पर्थ (ऑस्ट्रेलिया)
टीम इंडियाच्या प्रमुख खेळाडूंनी ऑप्टस स्टेडियमवरील ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी सराव सत्राला सुऊवात केली आहे. बहुप्रतीक्षित बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची पहिली कसोटी 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथील स्टेडियमवर खेळवली जाईल. दोन्ही संघांसाठी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे.
मायदेशात भारताकडून मालिका पराभव स्वीकारण्याची हॅट्ट्रिक रोखण्यासाठी ऑसिज चांगली सुऊवात करण्याचे लक्ष्य समोर ठेवून असतील यात शंका नाही. पाहुण्यांवरही न्यूझीलंडकडून घरच्या मैदानावर झालेल्या मालिकेत मानहानीकारक व्हाईटवॉश स्वीकारावा लागल्यानंतर जोरदार पुनरागमन करण्यास ते उत्सुक असतील. मागील 12 वर्षांत मायदेशात त्यांना स्वीकारावा लागलेला हा पहिला कसोटी मालिका पराभव होता.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मधल्या फळीतील फलंदाज के. एल. राहुल, स्टार फलंदाज विराट कोहली, अष्टपैलू रवींद्र जडेजा, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल हे या सत्रात सहभागी झाले. भारत वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सराव करत आहे. या ठिकाणाचा पुनर्विकास सुरू आहे आणि पुढील हंगामापूर्वी तो पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
मंगळवारी विराट, बुमराह, जडेजा आणि अश्विनसारखे अनुभवी खेळाडू उपस्थित नव्हते तर पंत, राहुल आणि जैस्वाल यांनी जाळ्यात भरपूर सराव केला. त्यांची सराव सत्रे तासभर चालली. फलंदाजांनी ऑस्ट्रेलियातील वेगवान आणि चेंडू उसळणाऱ्या परिस्थितीची सवय करून घेण्याचा प्रयत्न केला. पर्थमधील अनेक स्थानिक क्लबांच्या गोलंदाजांची निवड करून भारतीय खेळाडूंना गोलंदाजी करण्यासाठी त्यांचा उपयोग करण्यात आला. यात बाउन्सर फारसे पाहायला मिळाले नाहीत, मात्र आखूड टप्प्याच्या चेंडूंना प्रोत्साहन दिले गेले.
जैस्वाल त्याच्या कसोटी कारकिर्दीमध्ये जसा दिसला आहे तसाच आक्रमक अवतारासह फलंदाजी करताना दिसून आला. त्याच्या एका मोठ्या फटक्याने तर जाळ्याचे क्षेत्र पार करून ब्रेथवेट स्ट्रीटवर चेंडू पोहोचविला. फलंदाजी करताना पंत सुरात दिसला, पण त्याच्या अंगावरही चेंडू अनेक वेळा आदळले. बुधवारी विराटही जडेजा, अश्विन आणि बुमराह या प्रमुख खेळाडूंसह सरावासाठी आला. यह 36 वर्षीय खेळाडूने वेगवान गोलंदाजीवर लक्ष केद्रीत केले होते, ज्यांचा त्याने एका तासापेक्षा जास्त काळ सामना केला. चारही जाळ्यांत त्याने सराव केला. विराटवर यावेळी आखूड टप्प्याच्या चेंडूंचा तसेच यॉर्कर्सचा मारा करण्यात आला.