शेअर बाजाराची 6 महिन्यात दमदार कामगिरी
मिडकॅप, स्मॉलकॅप निर्देशांकांची चमक : रियल्टी निर्देशांक बहरला : निफ्टीतील 10 कंपन्यांचा 30 टक्केपेक्षा अधिक परतावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात भारतीय शेअर बाजारामध्ये कंपन्यांचे प्रदर्शन दमदार राहिलेले आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये पाहता पहिल्या सहा महिन्यातील कंपन्यांचे प्रदर्शन हे उत्साहवर्धक राहिले असल्याचे दिसून आले आहे. जानेवारी ते जून 2024 या कालावधीमध्ये निफ्टी 50 निर्देशांक 10.5 टक्के आणि बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 9.4 टक्केने वाढला आहे.
मिडकॅप, स्मॉलकॅपचा डंका
याच दरम्यान बीएसई मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक यांचे प्रदर्शनसुद्धा दमदार दिसून आले आहे. लार्ज कॅप कंपन्यांची कामगिरी उत्तम दिसून आली आहे. मिडकॅप निर्देशांक 25 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक 22 टक्के इतका वाढलेला दिसून आला. सहा महिन्याच्या कालावधीत वाहन आणि सार्वजनिक उपक्रमाशी संबंधित कंपन्यांचे समभाग अधिक तेजीमध्ये दिसून आले. त्यामध्ये मार्च तिमाहीत या क्षेत्रातील कंपन्यांनी उत्तम नफा प्राप्त केला होता. या पार्श्वभूमीवर देशातील गुंतवणूकदार या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीसाठी अधिक आग्रही दिसून आले.
रियल्टी निर्देशांक चमकला
गुंतवणूकदारांनी गेल्या सहा महिन्यांमध्ये अंदाजे दोन लाख कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवले असल्याचे समजून आले आहे. बीएसई रियल्टी निर्देशांक सहा महिन्याच्या कालावधीत 40 टक्के इतका दमदार वाढलेला पाहायला मिळाला. याच्यानंतर ऊर्जा निर्देशांक 37 टक्के आणि वाहन निर्देशांक 36 टक्के वाढीसह कार्यरत होता. निफ्टी-50 निर्देशांकामधील एकंदर 10 समभागांनी जानेवारी ते जून या कालावधीत 30 टक्क्यांपेक्षा अधिक तेजी दर्शवली होती. सेन्सेक्स निर्देशांक आणि निफ्टी निर्देशांक यांच्यापेक्षाही या कंपन्यांनी दमदार परतावा दिला आहे.
कोणत्या कंपन्या तेजीत
महिंद्रा आणि महिंद्राचे समभाग मात्र 66 टक्के वधारले आहेत. अदानी पोर्टस् अँड एसइझेडचे समभाग देखील या पाठोपाठ 44 टक्के आणि श्रीराम फायनान्सचे समभाग 43 टक्के वाढत बंद झाले होते. भारती एअरटेल, बजाज ऑटो आणि पॉवरग्रिड कॉर्प कंपन्यांचे समभाग 40 टक्के वाढीसोबत कार्यरत राहिले आहेत. गेल्या काही कालावधीमध्ये शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा गुंतवणुकीकडे अधिक कल वाढला आहे.
संस्थात्मक गुंतवणूक 3 पट अधिक
देशातील संस्थात्मक गुंतवणूकदारांनी चालू कॅलेंडर वर्षामध्ये भारतीय शेअर बाजारात पहिल्या सहा महिन्यात 2.3 लाख कोटी रुपये गुंतवले आहेत. 2023 कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यातील या गुंतवणूकदारांची गुंतवणूक पाहता यंदा ही गुंतवणूक तीन पट अधिक राहिली आहे. मागच्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांमध्ये देशातील संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 86 हजार 568 कोटी रुपये गुंतवले होते.
तेजीचे हे आहे कारण
दमदार जीडीपी वृद्धीचे वातावरण, देशातील म्युच्युअल फंडांच्यामार्फत केली जाणारी गुंतवणूक त्याचप्रमाणे जीएसटी आणि प्रत्यक्ष कर संग्रहामध्ये झालेली उल्लेखनीय वाढ यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक गुंतवणुकीकडे वाढला आहे. यादरम्यान चालू कॅलेंडर वर्षामध्ये पहिल्या सहा महिन्यात जवळपास 37 मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांचे बाजारमूल्य दुप्पट वृद्धीमध्ये दिसून आले आहे. यामध्ये वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीचे समभाग 396 टक्के, शक्ती पंप, कोचिन शिपयार्ड आणि ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स यांचे समभाग 210 ते 260 टक्के बंपर तेजीत राहिले आहेत.