मायक्रोटेक डेव्हलपर्सची दमदार कामगिरी
मुंबई :
बांधकाम क्षेत्रातील कंपनी मायक्रोटेक डेव्हलपर्सने (लोढा डेव्हलपर्स)आर्थिक वर्षात 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी केलीय. कंपनीने गेल्या तिमाहीत आगाऊ घरविक्रीतून 45.1 अब्ज रुपये प्राप्त केले आहेत. आतापर्यंतच्या कालावधीत मागच्या तिमाहीतील कामगिरी ही सर्वोच्च विक्रमी राहिली आहे.
ब्रोकरेज फर्म नुवामाने मायक्रोटेक डेव्हलपर्सच्या समभागासाठी 1749 रुपयांचे टार्गेट निश्चित केले आहे. सोमवारी कंपनीचे समभाग 1343 रुपयांवर व्यवहार करत होते. दीर्घकालीन पाहता हा समभाग 30 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो. गेल्या वर्षभरामध्ये समभागाने 20 टक्के परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. बांधकाम प्रकल्पातील घरांची दमदार विक्री, बुकींगच्या माध्यमातून मिळविलेली रक्कम आणि नव्या प्रकल्पांच्या उभारणीमुळे कंपनीने चांगली कामगिरी पार पाडली आहे. उत्सवी काळामध्ये कंपनीच्या प्रकल्पातील घरांना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद नोंदविला. वर्षाच्या आधारावर आगाऊ बुकींगमध्ये 32 टक्क्यांची तेजी नोंदविली आहे. या तिमाहीमध्ये बेंगळूरमध्ये कंपनीचा नवा प्रकल्प सुरू झाला असून आतापर्यंत एकूण 8 प्रकल्प कंपनीने लॉन्च केले आहेत. एनसीआरमध्ये अलीकडेच कंपनीने 33 एकरची जमीन खरेदी केली आहे.