मीराबाग बंधाऱ्याला सादरीकरणावेळी कडाडून विरोध
सावर्डे, सांगे, केपे, कुडचडेवासियांचा तीव्र आक्षेप, जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांची भंबेरी, उत्तरे देण्यास असमर्थ
प्रतिनिधी/ कुडचडे
मीराबाग-सावर्डे येथे प्रस्तावित बंधाऱ्याविरोधात पुकारलेल्या जनआंदोलनाचा 33 व्या दिवसाचा टप्पा शनिवारी अत्यंत वादळी ठरला. सावर्डे येथील गणेश सभामंडपात जलस्रोत खात्याने आयोजित केलेल्या सादरीकरणाच्या वेळी हजारो नागरिकांनी उपस्थित राहून ‘आमका नाका, आमका नाका, बंधारो आमका नाका’ अशा घोषणा देत आपला तीव्र निषेध नोंदवला. साडेतीन तास चाललेल्या या सादरीकरणावेळी आंदोलकांच्या तांत्रिक प्रश्नांपुढे सरकारी अधिकारी निऊत्तर झाले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अभिजित प्रभुदेसाई, आंदोलक उपेंद्र नाईक, आपा नाईक, संकेत भंडारी, प्रदीप काकोडकर, शंकर पोळजी, गौतम भंडारी, सामाजिक कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर, रामा काणकोणकर, मनीषा उसगावकर, सावियो डिसिल्वा, पंच सिद्धी पाऊस्कर, उमेश नाईक तसेच मोठ्या संख्येने सावर्डे, सांगे, केपे, कुडचडे येथील लोकांनी आणि काणकोण, कुंकळ्ळी, उसगाव, मडगाव व इतर भागातील आंदोलनाच्या समर्थकांनी उपस्थिती लावली.
तसेच सरकारी पातळीवर जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता ज्ञानेश्वर सालेलकर, साहाय्यक अभियंता अंकुश गावकर, अभियंता दिलीप नाईक, अभियंता गिब्सन मिरांडा, अभियंता जेसन मिनेझिस, काणकोण उपजिल्हाधिकारी प्रताप गावकर, सांगे उपजिल्हाधिकारी मिलिंद वेळीप, सांगे मामलेदार सिदार्थ प्रभू, धारबांदोडा मामलेदार मनोज कोरगावकर, काणकोण मामलेदार गजेश शिरोडकर आदी उपस्थित होते. सुरुवातीला मुख्य अभियंता अंकुश गावकर यांनी पडद्यावर सुरू केलेल्या चित्रफितीच्या आधारे सादरीकरण करून प्रकल्पाबद्दल माहिती दिली. त्यांनी मीराबाग बंधारा किती प्रमाणात फायदेशीर आहे व हा बंधारा हाती घेण्याचे कारण काय तसेच त्याची आकडेवारी सादर केली.
आंदोलकांनी आणले अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ
सदर सादरीकरण झाल्यावर आंदोलक संकेत भंडारी यांनी सादरीकरणाच्या विविध पैलूंवर प्रश्न विचारून उपस्थित अधिकाऱ्यांना नाकीनऊ आणले. भंडारी, उपेंद्र नाईक व आपा नाईक यांनी विचारलेल्या बहुतेक प्रश्नांची उत्तरे देण्यास अधिकारी असफल ठरले. सदर सादरीकरण सुमारे साडेतीन तास चालले. त्यात प्रदीप काकोडकर यांनी अभियंत्यांना मीराबाग व नदीच्या प्रवाहाच्या मुद्यावर धारेवर धरताना सरकारजवळ कोणती ठोस माहिती आहे ती दाखविण्याचा आग्रह धरला. त्याचबरोबर जलस्रोत खात्याने बेकायदेशीरपणे खोदलेले ख•s सरकार दरबारातून लेखी आदेश दिला गेला असताना अजूनपर्यंत बुजविण्यात आलेले नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधले.
इतिवृत्त वाचून दाखविण्यास पाडले भाग
शेवटी उपस्थित लोकांनी येथील बंधारा कायमचा रद्द करावा असा आग्रह करत ‘आमका नाका, आमका नाका, बंधारो आमका नाका’, ‘आमचो गाव आमका जाय, आमचे शेत आमका जाय’ अशा विविध घोषणा दिल्या. या सादरीकरणावेळी अभियंत्यांनी सर्व मुद्दे वहीवर नोंद करून सह्या केल्या व त्यानंतर उपस्थितांच्या सह्या घेण्यात आल्या. सादरीकरणाच्या शेवटच्या टप्प्यात उपस्थित असलेल्या सर्वांनी यावेळी जी चर्चा झाली त्यावरील अहवाल किंवा इतिवृत्त वाचून दाखविण्याची मागणी केली. त्याप्रमाणे साहाय्यक अभियंता शांताराम गावकर यांनी इतिवृत्त सर्वांसमक्ष वाचून दाखविले.
इतिवृत्तामध्ये पुढीलप्रमाणे मुद्दे नोंद करण्यात आले आहेत. सावर्डे, सांगे आणि कुडचडे तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांनी बंधारा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. लोकांनी जे प्रश्न उपस्थित केले त्यातील तांत्रिक मुद्यांवर अधिकाऱ्यांकडे उत्तरे नव्हती, त्यामुळे पुढील सखोल अभ्यासाची गरज आहे. बंधारा प्रकल्प रद्द करण्याची मागणी शासकीय मंजुरीसाठी पुढे पाठवली जाईल. उपस्थित रहिवाशांनी विविध माहितीची मागणी केली असून त्यामध्ये पर्यावरण प्रभाव मूल्यांकन, जैवविविधता, पुरातत्व अभ्यास, पूर मूल्यांकन, भरती-ओहोटीचा परिणाम, किनारपट्टी व्यवस्थापन अभ्यास, जमीनमालकांकडून ना हरकत दाखला इत्यादींचा समावेश आहे. उपस्थितांनी धरणांमधील आणि नद्यांमधील गाळ उपसल्यास प्रस्तावित बंधाऱ्यापेक्षा जास्त पाणी मिळू शकते, असे सूचविले आहे. पंपासाठी खोदलेला खड्डा मंगळवार 17 पर्यंत बुजविला जाईल, असे या इतिवृत्तामध्ये नमूद करण्यात आले आहे.