साटेलीत मायनिंग नेण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध
प्रथम नुकसानग्रस्तांचा विचार करावा ; संजय नाईक
न्हावेली / वार्ताहर
साटेली तर्फ सातार्डा गावातील मायनिंगमुळे जमीनदार, शेतकरी, बागायतदार, डंपर व्यावसायिक, मायनिंग क्षेत्रात काम करणारे कामगार तसेच ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हरिदलवादाचे नियम धाब्यावर बसवून मायनिंग सुरू केले. दिवाळी तोंडावर असून साठवून(डंप) ठेवलेला मायनिंगचा माल नेण्याबाबत हालचाली सुरू आहेत. परंतु नुकसानग्रस्तांचा विचार न केल्यास संबंधितांना ग्रामस्थांच्या तीव्र विरोधास सामोरे जावे लागेल असा इशारा, साटेलीतील सामाजिक कार्यकर्ते संजय नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
श्री. नाईक म्हणाले की, साटेली तर्फ सातार्डा येथे असलेल्या मायनिंग कंपनीने हरिदलावादाचे नियम धाब्यावर बसवून काजू, आंबा, नारळ, सुपारी बागायत शेतकऱ्यांचे नुकसान केले. डंपर व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी महिलांनी अंगावरचे दाग दागिने विकून डंपर घेतले. परंतु सद्यस्थितीत बँकांची कर्ज फेडताना डंपर व्यावसायिकांच्या नाकी नऊ आले आहेत. त्यामुळे 'तेलही गेले तूपही गेले हाती आले धुपाटण' अशी अवस्था मायनिंग प्रकल्पाने केल्याचे संजय नाईक यांनी सांगितले.
सोने मिळणारे मायनिंग अशी ओळख साटेली गावची माध्यमांमुळे झाली. मात्र सद्यस्थितीत माळीन सारखी परिस्थिती निर्माण होईल अशी अवस्था येथील मायनिंग परिसराची झाली आहे. या मायनिंग शेजारी घरे, वाड्या, वस्ती, पाणी, देवस्थान अशी रचना आहे. त्यामुळे गावाला नुकसान पोहोचविणाऱ्या अशा मायनिंग प्रकल्पांच्या एजंटांना कायमच विरोध राहील. यात कुठल्याही राजकीय पक्ष, पुढारी, नेते अथवा स्वयंघोषित मायनिंग लीडर यांनी पडू नये. अन्यथा कायदेशीर कारवाईची तीव्र लढाई लढत हरिदलवादाकडे दाद मागणार असून वेळप्रसंगी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संजय नाईक यांनी दिला.