आयआयटीला कोडार गावातूनही प्रखर विरोध
गावच्या अस्तित्त्वाचा सौदा खपवून घेणार नाही : ग्रामस्थांना अंधारात ठेऊन कोमुनिदादचे कारस्थान
फोंडा : आयआयटी कॅम्पसला आता कोडार गावातूनही जोरदार विरोध सुऊ झाला आहे. या पार्श्वभूमिवर ग्रामस्थांची पहिली जाहीर बैठक सोमवारी सायंकाळी येथील श्री बेताळ मंदिरच्या सभागृहात झाली. आयआटीसाठी कृषीप्रधान अशा कोडार गावाची ओळख नष्ट कऊन आमच्या पिढीजात कृषी व्यावसायावर पाणी सोडायला देणार जाणार नाही. या प्रकल्पाला आमचा ठाम विरोध असून त्यासाठी गावच्या अस्तित्वाचा सौदा केला जाणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांकडून करण्यात आला. आयआयटी गोवाच्या स्वतंत्र कॅम्पससाठी फोंडा तालुक्यातील कोडार गावात कोमुनिदादची जागा निश्चित करण्यात आली असून या व्यावहाराला कोमुनिदाद समितीने मान्यता दिली आहे. कोडार गाव बेतोडा पंचायत क्षेत्रात येत असून तेथील कोमुदादच्या सर्वे क्र. 63/2 मधील साधारण 14 लाख 63 हजार चौ. मिटर जमिनीचा शासकीय पातळीवर खरेदी व्यवहार सुऊ झाला आहे. ग्रामस्थांना याचा सुगावा लागल्यानंतर गेल्या आठवड्यापासून विरोधाची ठिणगी पडली आहे.
गाव उद्ध्वस्त करुन महाप्रकल्प नको
सोमवारी सायंकाळी झालेल्या बैठकीला गावातील काही मोजकीच घरे सोडल्यास प्रत्येक घरातील किमान एक कुटुंबसदस्य बैठकीला उपस्थित होता. त्यामध्ये महिला व तऊणवर्गाची संख्याही लक्षणीय होती. कोमुनिदाद समितीने गावाला अंधारात ठेऊन आयआयटीला जागा देण्यासाठी सरकारकडे केलेला सौदा आम्हाला कदापी मान्य नाही. गाव उद्ध्वस्त कऊन आयआयटी सारख्या अवाढव्य प्रकल्पाला ठाम विरोध आहे व त्याविरोधात संपूर्ण गाव एकत्र असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. त्यासाठी कोडार वाचवा कृती समितीही निवडण्यात आली असून त्यात आयसीएआरचे निवृत्त कृषीतज्ञ विश्राम गावकर यांच्यासह साईश गावकर, पांडुरंग गावकर व वैकुंठ गावकर यांचा समावेश आहे.
सरकारी राजपत्रात आयआयटीसाठी ज्या 14 लाख चौ. मीटर विनावापर, खडकाळ व पडिक जमिनीचा उल्लेख केलेला आहे, ती मुळात तेवढी नाही. प्रत्यक्षात ही जमीन जेमतेम 2 लाख चौ. मीटर आहे. उर्वरीत जागा कृषी व अन्य वापरात आहे. आयआयटी गोवासाठी किमान 12 लाख चौ. मीटर जागेची आवश्यकता असल्याने सुपिक व येथील कुळांकडून कसली जाणारी जमीन ताब्यात घेतली जाऊ शकते. कारण हा प्रकल्प अवाढव्य आहे. आयआयटी खडकपूरच्या कॅम्पसचा आवाका साधारण 84 लाख चौ. मीटर एवढा प्रशस्त आहे. यावऊन गावातील अर्ध्याहून अधिक जमीन आयआयटी हस्तगत कऊ शकते. ज्या कोमुनिदादच्या जमितीचा सौदा आयआयटीसाठी केलेला आहे, त्यात 46 कुटुंबे उदरनिर्वाहासाठी विविध प्रकारची कृषी लागवड करतात. 1995 मध्ये त्यांना मामलेदारांनी कुळ म्हणून मान्यता दिली आहे. याशिवाय इतर काही कुटुंबेही कुळ म्हणून नोंद झाली असून त्यांचे खटले प्रलंबित आहेत. गावातील बहुतेक कुटुंबे आजही शेती बागायती कसून उदरनिर्वाह चालवितात. या प्रकल्पामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधनच अडचणित येणार आहे.
जलस्रोत व वन्य प्राण्यांचा अधिवास धोक्यात येणार
शेतीबरोबरच समृद्ध अशा वन्यसंपदेने कोडार गाव व्यापले आहे. आयआयटी प्रकल्पासाठी येथील बेसुमार झाडांची कत्तल, उंचवटे असलेल्या ठिकाणी डोंगर कापणी व मुख्य म्हणजे नैसर्गिक जलस्रोतांवर घाला घातला जाणार आहे. खांडेपार नदी कोडार गावातून वाहत असल्याने प्रकल्पाचे काम सुऊ झाल्यानंतर व भविष्यातही नदीच्या पाण्याचे प्रदूषण अटळ आहे. ओपा पाणी प्रकल्पाच्या माध्यमातून राजधानी पणजीसह फोंडा व अन्य भागात हे प्रदूषित पाणी पोचण्याचा धोका आहे. याशिवाय कोडार गाव हे वन्यप्रण्यांचे अधिवास क्षेत्र असल्याने आयआयटी कॅम्पसच्या सभोवताली भक्कम कुंपण उभारल्यानंतर येथील गवेरेडे व अन्य प्राणी सैरभैर होतील. खाद्य व पाण्यासाठी त्यांचे नैसर्गिक स्रोत नष्ट होणार असल्याने हे वन्यप्राणी लोकवस्तीकडे वळतील. कोडार गांव मुळात शांत असून येथील लोकवस्तीही विरळ आहे. गावाची लोखसंख्या जेमतेम दीड हजारापर्यंत आहे. आयआयटी हा अवाढव्य प्रकल्प असल्याने तेथे किमान 30 हजार लोक येतील. ज्यामुळे गावातील जलपुरवठा व अन्य गरजांच्या मागणीमध्ये वीस पटीने वाढ होणार आहे. अऊंद असलेले रस्ते चौपदरी होतील. वाहतुकीचे प्रमाणही वाढेल. ज्यामुळे गावातील माहोल विविध अंगांनी प्रदूषित होण्याची भिती आहे.
रोजगाराच्या संधी या निव्वळ थापा
आयआयटीमुळे गावातील नागरिकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा ग्रामस्थांनी साफ फेटाळून लावला आहे. अशा संस्थामध्ये ग्रामस्थांना रोजगार किंवा अन्य व्यावसायाच्या संधीना कुठेच जागा नाही. यापूर्वी राज्य सरकारच्या कृषी फार्मसाठी कोडार कोमुदादची लाखो चौ. मीटर जागा दिली आहे. मात्र गावातील एकाही व्यक्तीला तेथे नोकरी मिळालेली नाही. त्यामुळे या भूलथापांवर ग्रामस्थांचा विश्वास नाही. कोमुनिदादच्या जमिनीचा मुख्य उद्देश गावातील सामूहिक गरजा पूर्ण करणे व गरजूंसाठी निवाऱ्याची व अन्य साधने उपलब्ध करणे होय. कोडार गावामध्ये शिल्लक असलेली सर्व जमीन आयआयटीला दिल्यास, येणाऱ्या पिढ्यांसाठी गावात जमीन शिल्लक राहणार नाही. पुढच्या शंभर वर्षांत ग्रामस्थांच्या गरजा काय असतील हे आत्ताच सांगता येणार नाही. पण गावाच्या हितासाठी एखादा प्रकल्प किंवा उपक्रम राबवायचा झाल्यास आयआयटीकडून परत जमीन मिळणार नाही.
ग्रामस्थांना अंधारात ठेऊन जमिनीचा सौदा
ग्रामस्थांपैकी बरेचजण कोडार कोमुदादचे भागधारक असून सर्वांना अंधारात ठेऊन कोमुनिदाद समितीने परस्पर हा सौदा केलेला आहे. त्याला गावाची कुठलीच मान्यता नाही. आयआयटीसारख्या अवाढव्य प्रकल्पाला तर गावात मुळीच थारा दिला जाणार नाही. याविरोधात जागृती व पुढील कृती म्हणून येत्या दोन दिवसांत स्थानिक आमदार तथा जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांना निवेदन सादर करण्यात येईल. बेतोडा पंचायतीला निवेदन सादर कऊन आयआयटीच्या विषयावर विशेष ग्रामसभा बोलावण्याची मागणी केली जाणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.