राज्यातील स्टार्टअप क्षेत्रात महिलांचे सकस नेतृत्व
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : 624 स्टार्टअप्स कार्यरत ,50 टक्के स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली, जागतिक एमएसएमई दिन 2025चा कार्यक्रम साजरा
पणजी : गोव्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या 624 स्टार्टअप्स कार्यरत असून, त्यातील जवळपास 50 टक्के स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे चालवली जात आहेत. गोवा हे आता महिला नेतृत्वासाठी सक्षम आणि आश्वासक मंच बनत आहे. ही गोमंतकीय समाजासाठी गौरवाची गोष्ट आहे. महिला उद्योजकांच्या योगदानाची प्रशंसा करत महिलांना पुढे जाण्यासाठी सरकार सर्वतोपरी पाठिंबा देत आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नमूद केले आहे. ‘सस्टेनेबल आणि डिजिटल भविष्य घडविण्यासाठी एमएसएमई सक्षमीकरण’ या विषयावर आधारित जागतिक एमएसएमई दिन 2025चा मुख्य कार्यक्रम पणजी येथील आयएमबीमध्ये आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालयातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, उद्योग विभागाचे सचिव सुनील अंचिपका (आयएएस), उद्योग संचालक अश्विन चंद्रू (आयएएस), असोचेम गोवा परिषदेचे अध्यक्ष मांगिरीश पै रायकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, राज्य सरकारने आयटी क्षेत्रातील नवउद्योजकांना चालना देण्यासाठी विविध योजना राबवल्या आहेत. मात्र, आता या योजना केवळ आयटीपुरत्या मर्यादित न ठेवता, इतर उद्योग क्षेत्रांतील स्टार्टअप्ससाठीही लवकरच त्यांचा विस्तार केला जाईल.
कुणबी साडीला नवसंजीवनी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील पारंपरिक कुणबी साडीच्या सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकताना सांगितले की, मी मुख्यमंत्री होण्यापूर्वी या साडीचा वापर जवळजवळ लुप्त होत चालला होता. लोक ती साडी विसरू लागले होते. मात्र राज्य सरकारने या परंपरेला नवसंजीवनी देत पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. गोमंतकीय ओळख जपणाऱ्या या पारंपरिक वेशभूषेला प्रोत्साहन देत सरकारने केवळ वस्त्र संस्कृतीचा वारसा जपला नाही, तर स्थानिक हातमाग व्यवसायालाही चालना दिली. विस्मरणात गेलेली कुणबी साडी आज समाजात पुन्हा ऊजली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिचे कौतुक होत आहे. गोव्यातील परंपरा, हस्तकला आणि कापड उद्योगात अमर्याद शक्यता दडलेल्या आहेत. योग्य दिशा आणि प्रोत्साहन मिळाल्यास गोमंतकीय उत्पादने जागतिक स्तरावरही आपली छाप सोडू शकतात.
गोव्याच्या सर्वांगीण विकासाची नवी वाटचाल
‘स्वयंपूर्ण गोवा’ या अभियानातून गोव्याच्या सामाजिक व आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्याचे कार्य सुरू आहे. स्थानिक उत्पादने प्रोत्साहन, पारंपरिक कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि उद्योजकतेला चालना देणे यावर या योजनेचा विशेष भर आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले की, गोवा केवळ पर्यटनासाठी ओळखला जाणारा प्रदेश न राहता, नवकल्पना आणि उद्योगांची नवी राजधानी बनावा, अशी शासनाची दिशा आहे. या अभियानातून केवळ आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार नाही तर सांस्कृतिक मुळे जपण्याचा आणि स्थानिकांना सक्षम करण्याचा प्रयत्नही केला जात आहे.
आतापर्यंत 70 हजारहून अधिक & नोंदणी ’उद्यम’ पोर्टलवर
गोव्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी 2024 मध्ये तब्बल 21 कोटींच्या निर्यातीचा टप्पा गाठत राज्याच्या आर्थिक प्रगतीत भरीव योगदान दिले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. त्यांनी सांगितले की, गोव्यात आतापर्यंत 70 हजारहून अधिक एमएसएमई उद्योजकांची नोंदणी ‘उद्यम’ पोर्टलवर झाली असून, त्यापैकी 60 टक्के सेवा क्षेत्रातील असून तब्बल 97 टक्के उद्योग हे मायक्रो स्वरूपाचे आहेत.