अॅकरमन, रिकेल्टन यांची दमदार अर्धशतके
तिसरी कसोटी, चौथा दिवस : चहापानापर्यंत दक्षिण आफ्रिकेला 194 धावांची आघाडी, मुल्डर अर्धशतकासमीप, स्टार्कचे दोन बळी
वृत्तसंस्था, केपटाऊन
येथे सुरु असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीत शुक्रवारी खेळाच्या चौथ्या दिवशी चहापानापर्यंत दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 5 बाद 294 धावा जमवित ऑस्ट्रेलियावर 194 धावांची आघाडी मिळवली होती. दक्षिण आफ्रिकेच्या डावात मार्क्वेसअॅकरमन आणि रेयान रिकेल्टन यांनी दमदार अर्धशतके झळकवली.
या कसोटी मालिकेतील ही शेवटची कसोटी निर्णायक असून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांनी यापूर्वी प्रत्येकी एक सामना जिंकून 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या शेवटच्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 329 धावांवर समाप्त झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात दमदार फलंदाजी करत 429 धावा जमवित दक्षिण आफ्रिकेवर 100 धावांची आघाडी मिळवली. दक्षिण आफ्रिकेने 4 बाद 140 या धावसंख्येवरुन शुक्रवारी चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. चहापानापर्यंत त्यांनी 75 षटकात 5 बाद 202 धावांपर्यंत मजल मारली. खेळाच्या पहिल्या सत्रात कर्णधार बवुमा लियॉनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने 1 चौकारासह 35 धावा जमविल्या. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेचा सलामीचा फलंदाज अॅकरमनने 80 चेंडूत 8 चौकारांसह 62 धावांचे योगदान दिले होते. बेडिंगहॅमने 1 चौकारासह 11 धावा केल्या मार्करम एका धावेवर बाद झाला. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात 78 धावा जमविल्या होत्या. अॅकरमनचे या सामन्यातील हे सलग दुसरे अर्धशतक आहे. पहिल्या डावात त्याचे शतक केवळ 5 धावांनी हुकले होते. बवुमा बाद झाल्यानंतर रिकेल्टन आणि ब्रित्झके यांनी पाचव्या गड्यासाठी 50 धावांची भागिदारी केली.
उपाहारानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा नवा चेंडू घेतला. रिकेल्टनने 7 चौकारांसह 105 चेंडूत अर्धशतक झळकविले. ब्रित्झके कमिन्सच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 5 चौकारांसह 43 धावा जमविल्या. रिकेल्टन आणि मुल्डेर या जोडीने दक्षिण आफ्रिकेचा डाव चांगलाच सावरला. या जोडीने चहापानापर्यंत सहाव्या गड्यासाठी 110 धावांची अभेद्य शतकी भागिदारी केली. चहापानावेळी रिकेल्टन 11 चौकारांसह 83 तर मुल्डेर 1 षटकार आणि 3 चौकारांसह 46 धावांवर खेळत होते. चहापानावेळी दक्षिण आफ्रिकेने 103 षटकात 5 बाद 294 धावा जमवित ऑस्ट्रेलियावर 194 धावांची आघाडी मिळवली आहे. ऑस्ट्रेलियातर्फे स्टार्कने 2 तर हॅझलवूड, कमिन्स आणि लियॉन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला होता.
संक्षिप्त धावफलक - दक्षिण आफ्रिका प. डाव सर्वबाद 329, ऑस्ट्रेलिया प. डाव सर्वबाद 429, दक्षिण आफ्रिका दु. डाव 103 षटकात 5 बाद 294 (अॅकरमन 62, बेडिंगहॅम 11, बवुमा 35, ब्रित्झके 43, रिकेल्टन खेळत आहे 83, मुल्डेर खेळत आहे 46, अवांतर 13, स्टार्क 2-51, हॅझलवूड, कमिन्स व लियॉन प्रत्येकी 1 बळी.
