7 कंपन्यांच्या बाजार भांडवलमूल्यात दमदार वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आघाडीवरच्या 7 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यामध्ये 3 लाख कोटी रुपयांनी वाढले असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये एचडीएफसी बँक, एलआयसी या कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य सर्वाधिक वाढले आहे.
मागच्या आठवड्यामध्ये आघाडीवरच्या दहापैकी सात कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 3 लाख 4 हजार 477.25 कोटी रुपयांनी वाढले होते. बीएसई सेन्सेक्स निर्देशांक जवळपास 2234 अंकांनी म्हणजेच 3.47 टक्के इतका दणदणीत वाढला होता. शुक्रवारी 303 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 69,825 अंकांवर विक्रमी स्तरावर बंद झाला होता.
एचडीएफसी बँक, एलआयसी, टीसीएस आघाडीवर
एचडीएफसी बँक, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये विक्रमी वाढ दिसून आली. एचडीएफसी बँकेच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये 74 हजार 76 कोटी रुपयांची भर पडली असून भांडवल मूल्य 12 लाख 54 हजार 664 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. दुसरीकडे एलआयसीचे बाजार भांडवल 65,558 कोटी रुपयांनी वाढून 4 लाख 89 हजार 428 कोटी रुपयांवर पोहोचले होते. शुक्रवारी एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य 5 लाख कोटी रुपयांच्या टप्प्यावर स्थित होते. आयसीआयसीआय बँकेच्या बाजार भांडवल मूल्यात 45,466 कोटींची वाढ होऊन ते 7 लाख 8 हजार 836 कोटी रुपयांवर राहिले. 42 हजार 737 कोटी रुपयांच्या वाढीसह टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 13 लाख 26 हजार 918 कोटी रुपयांवर पोहचले.