युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी जोरदार प्रयत्न
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
युक्रेन आणि रशिया यांच्यात दोन वर्षांहून अधिक काळ चाललेले युद्ध थांबविण्यासाठी अमेरिकेने जोरदार प्रयत्न चालविला आहे. अमेरिका आणि रशिया यांच्यात यासाठी प्रथम चर्चा होणार आहे. या चर्चेसाठी दोन्ही देश आपापली प्रतिनिधी मंडळे स्थापन करणार आहे. येत्या काही दिवसांमध्येच ही निवड होईल.
वाटाघाटी करण्यासाठी प्रतिनिधी मंडळ स्थापन केले जाण्याच्या वृत्ताला व्हाईट हाऊसने दुजोरा दिला आहे. रशियाचे व्रेमलिन येथील प्रतिनिधी युरी उषाकोव्ह यांनीही आपल्या देशाच्या टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत या निर्णयाला दुजोरा दिला. हे युद्ध थांबविण्यासाठीची पुढील चर्चा योग्यवेळी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
रियाध येथील बैठकीत निर्णय
युव्रेन युद्ध थांबविण्याचा प्रयत्न करण्यासाठी सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे अमेरिका, रशिया आणि सौदी अरेबिया या देशांची संयुक्त बैठक झाली आहे. याच बैठकीत अमेरिका आणि रशिया यांनी आपापली प्रतिनिधी मंडळे निवडण्याचा निर्णय घेण्यात आला. आधी अमेरिका आणि रशिया यांच्यात चर्चा केली जाईल. नंतर युक्रेनला चर्चेत सामावून घेतले जाईल. युरोपियन देशांना या चर्चेत नेमके कोणते स्थान मिळणार हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. मात्र, युक्रेनने युरोपियन देशांनाही विश्वासात घेण्याची भाषा केली आहे. आगामी दोन ते तीन आठवड्यांमध्ये या संबंधातील नेमके चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
पुढील चर्चेसाठीचा पाया
रियाध येथील चर्चेत पुढील चर्चेसाठी पाया निर्माण करण्यात आला आहे. अमेरिकेचे ट्रम्प प्रशासन यात पुढाकार घेत आहे. हे युद्ध लवकरात लवकर थांबावे, अशी अमेरिकेची इच्छा असून अमेरिका त्यासाठी युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांना तयार करीत आहे. एकीकडे युक्रेनचे साहाय्य थांबविण्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे, तर दुसरीकडे रशियावर आर्थिक प्रतिबंध लादण्यासंबंधी विधाने केली आहेत. दोन्ही देशांवर अशाप्रकारे दबाव आणून त्यांना शांतता प्रस्थापित करण्याचे अमेरिकेचे धोरण दिसून येते, असे तज्ञांचे मत आहे.
दूरध्वनी चर्चेमुळे फुटली कोंडी
गेल्या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात दूरध्वनीवरुन प्रदीर्घ चर्चा झाली होती. या चर्चेनंतर परिस्थितीत बरीच परिवर्तने घडली आहेत. रशियाने आपली भूमिका सौम्य केली असून अमेरिकेनेही काही पावले पुढे येण्याचा निर्णय घेतला आहे. युव्रेननेही चर्चेला आपण सज्ज असल्याचे प्रतिपादन केले असून लवकरच यासंदर्भात पुढची पावले उचलली जातील, असे संकेत या तिन्ही देशांकडून मिळत आहेत.