पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कॅन्टोन्मेंटचे जोरदार प्रयत्न
जुन्या विहिरींच्या पुनरुज्जीवनासह शुद्धीकरण प्रकल्पांची उभारणी
बेळगाव : बेळगाव शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळेच कॅन्टोन्मेंट बोर्डने जुन्या विहिरींचे पाणी वापरात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कॅन्टोन्मेंट क्वॉर्टर्स येथील विहिरीवर जलशुद्धीकरण प्रकल्प बसविण्यात येत आहे. यामुळे आसपासच्या नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. येत्या काही दिवसांत या कामाची पूर्तता होणार असल्याची माहिती कॅन्टोन्मेंटने दिली आहे. यावर्षी बेळगावसह राज्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. मुबलक प्रमाणात पाऊस न झाल्याने फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले. यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने नैसर्गिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील अनेक दिवसांपासून वापराविना असणाऱ्या विहिरींमधील गाळ काढून त्याचे पाणी वापरासाठी घेण्यात येत आहे. कोंडाप्पा स्ट्रीट येथील जुन्या विहिरीचे लायन्स क्लबच्या मदतीने पुनरुज्जीवन करण्यात आले. हे पाणी आता आसपासच्या नागरिकांना वापरासाठी दिले जात आहे. इस्लामिया स्कूल रोडवरील क्वॉर्टर्स परिसरात एक छोटीशी विहीर आहे. त्या विहिरीला मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा असून यापूर्वी वापरासाठी पाण्याचा वापर केला जात होता. या ठिकाणी 6 लाख 50 हजार रुपये खर्च करून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जात आहे. कॅन्टोन्मेंटच्या मागील सर्वसाधारण बैठकीत जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर निविदा काढून कामाचे कंत्राट देण्यात आले.
नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार
यावर्षी पाणीसाठा अत्यंत कमी असल्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डने जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बोर्डमधील चार ते पाच विहिरींचे पुनरुज्जीवनाचे काम सुरू आहे. क्वॉर्टर्स परिसरात जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जात असून यामुळे वॉर्ड क्र. 7 मधील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
- सुधीर तुपेकर (कॅन्टोन्मेंट नामनिर्देशित सदस्य)