महापालिकेच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी
माजी नगरसेवक संघटनेच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन
बेळगाव : बेळगावातील माजी महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांनी विद्यमान नगरसेवकांच्या कामकाजाबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. बेळगावच्या महापालिकेला मोठा इतिहास आहे. त्यामुळे नगरसेवकांनी जनहितासाठी काम केले पाहिजे. महापौर, उपमहापौर व नगरसेवकांनी आपले अधिकारी अधिकाऱ्यांना देऊ नये. सभागृह महापौरानीच चालविले पाहिजे. मात्र अधिकारीवर्ग महापालिका चालवत आहे. अजेंड्यावर घरपट्टी वाढीचा विषय नसतानाही 3 टक्के घरपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव ऐनवेळी कौन्सिल सेक्रेटरींना मांडला व त्याला मंजुरीही देण्यात आली. हा प्रकार चुकीचा आहे, असा आरोप माजी महापौर, उपमहापौर व नगरसेवक संघटनेच्यावतीने करण्यात आला.
माजी नगरसेवक संघटनेच्यावतीने मंगळवारी शहरातील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुरुवातीला सेक्रेटरी माजी नगरसेवक दीपक वाघेला यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. यावेळी माजी आमदार रमेश कुडची म्हणाले, 1977 च्या कायद्यानुसार उपलब्ध निधी आणि मिळणाऱ्या निधीचे विश्लेषण करूनच अर्थसंकल्प सादर केला पाहिजे. महापालिकेला मिळालेला निधी सध्या थकीत असताना अतिरिक्त अर्थसंकल्प कसा सादर करण्यात आला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सभागृहाच्या शिस्तीचे पालन करून त्या ठिकाणी झालेल्या ठरावाप्रमाणेच अधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे. मात्र महापालिकेत उलट सुरू आहे. नगरसेवक नवखे असल्याने त्याचा गैरफायदा अधिकारीवर्ग उठवत आहे.
पूर्वी दर पाच वर्षांनी घरपट्टी वाढविली जात होती. पण अधिकारी महापालिका कायद्याकडे दुर्लक्ष करून आपल्या अधिकाऱ्याचा गैरवापर करीत आहेत. एसएफसी निधीबद्दल अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती नाही. रस्त्यांच्या दुरुस्तीवर कर आकारली पाहिजे. विविध मोबाईल कंपन्या, हेस्कॉम, त्याचबरोबर टॉवर्सकडून कर वसूल केला पाहिजे. शहरातील समस्या सोडविण्यासाठी कमांड कंट्रोल सेंटर सुरू करण्यात आले आहे. पण ते सध्या देखरेखीअभावी बंद आहे. महापालिकेकडे पैसे नसल्याचे कारण सांगत सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यापासून थकविले आहे. पण अधिकाऱ्यांचे वेतन कसे काय होत आहे, असा सवाल उपस्थित केला.
माजी महापौर अॅड. नागेश सातेरी म्हणाले, महापालिकेची थकबाकी मोठी असून ती योग्यरित्या वसूल केली पाहिजे. ऐनवेळी घरपट्टी वाढविण्याचा विषय कौन्सिल सेक्रेटरींनी सभागृहात मांडणे चुकीचे आहे. 75 कोटी रुपयांचे अनुदान कोठे गेले. स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहर नव्हे तर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी स्मार्ट झाले आहेत. यापूर्वी बेळगाव महापालिका राज्यात पहिल्या क्रमांकावर होती. करवसुलीतही आघाडीवर होती. जर माजी नगरसेवकांच्या सल्लागार समितीची गरज असेल तर त्यासाठी आम्ही तयार आहोत. लोकांना न्याय देणे हे आपले कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.
त्यावेळी माजी महापौर संघटनेचे अध्यक्ष शिवाजी सुंठकर म्हणाले, यापूर्वी मनपा आणि जनतेचे सलोख्याचे नाते होते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता त्यामध्ये आंतर वाढत आहे की काय, असे वाटत आहे. शहरातील जनतेला सर्व मुलभूत सेवा पोहोचल्या पाहिजेत. 1984 पासून महापौर, उपमहापौरांसदर्भात लोकांमध्ये आदराची भावना होती. त्यामुळे सध्याच्या नगरसेवकांनी असे काम केले पाहिजे की त्यांना लोकांमधून आदर मिळायला पाहिजे. जनतेचा विश्वास संपादन करून आपले कर्तव्य पार पाडावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर माजी उपमहापौर मालोजी अष्टेकर, माजी महापौर रेणू किल्लेकर, वंदना बेळगुंदकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव, रणजीत चव्हाण-पाटील, सुनील बाळेकुंद्री, अॅड. एम. बी. निर्वाणी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.