समस्यांचे निवारण त्वरित न केल्यास तीव्र आंदोलन
मॅक्सी कॅबमालक संघटनेचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा
बेळगाव : केंद्र व राज्य सरकारकडून वाहतुकीसाठी नवे नियम जारी करण्यात आले आहेत. नियमांच्या माध्यमातून वाढीव पैसे वसूल करण्यात येत आहेत. यामुळे मॅक्सी कॅबमालकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. तसेच या नियमामुळे व्यवसाय चालविले कठीण बनणार असून अनेकांना निरुद्योगी व्हावे लागणार आहे. यासाठी आपल्या समस्यांचे 15 दिवसांच्या आत निवारण करण्यात यावे. अन्यथा बेळगाव अधिवेशनादरम्यान तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उत्तर कर्नाटक मॅक्सी कॅबमालक संघटनेतर्फे निवेदनाद्वारे दिले.
आम्ही गेल्या 32 वर्षांपासून सार्वजनिकांना सेवा देत आहोत. उत्तर कर्नाटकात सुमारे 5 हजार पॅसेंजर मॅक्सीकॅब आहेत. दरम्यान 2023 पासून 12+1 अशी आसनव्यवस्था निश्चित केली होती. मात्र यात बदल करत 22+1 आसनव्यवस्थेला परवानगी देण्यात आली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध नियमांमुळे वर्षाला 80 हजार रुपये विविध कर भरावा लागणार आहे. यामुळे मालकांना आर्थिक भार सहन करावा लागणार असल्यामुळे कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. यासाठी समस्यांचा निवारण करून दिलासा देण्याची मागणी करण्यात आली.