ऑपरेशन सिंदूरनंतर घुसखोरांवर स्ट्राइक
एका महिन्यात हजारो बांगलादेशींची हकालपट्टी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद विरोधात मोठे युद्ध पुकारले आहे. याचदरम्यान भारताने घुसखोरांच्या विरोधातही मोठी कारवाई केली आहे. मागील महिन्यात हे ऑपरेशन सुरू झाल्यापासून देशात अवैध स्वरुपात राहत असलेल्या हजारो बांगलादेशींना देशातून हाकलण्यात आले आहे. एका अहवालानुसार आतापर्यंत 2 हजार घुसखोरांना त्यांच्या मायदेशी पाठविण्यात आले आहे. ही कारवाई अद्याप जारी आहे. याचदरम्यान भारत-बांगलादेश सीमेवर तणाव देखील वाढला आहे.
भारतीय अधिकाऱ्यांनी 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून 2 हजारांहून अधिक अवैध बागंलादेशी घुसखोरांना परत पाठविले आहे. अधिकाऱ्यांपूर्वी त्यापूर्वी देशभरात पडताळणी प्रक्रियाही सुरू केली आहे. मोठ्या कारवाईनंतर घाबरलेले 2 हजारांहून अधिक घुसखोर स्वत:हून सीमेनजीक पोहोचले आहेत.
संशयितांच्या दस्तऐवजांची पडताळणी करत त्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. खासकरून महत्त्वाच्या शहरांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे. गुजरात, दिल्ली आणि हरियाणातून याची सुरुवात झाली आहे. लवकरच अन्य राज्यांमध्ये देखील याची सुरुवात केली जाणार असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले आहे.
बॉर्डर गार्ड्स बांगलादेशची प्रतिक्रिया
देशातून हाकलण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांपैकी निम्मे जण गुजरातमध्ये वास्तव्य करत होते. तर दिल्ली आणि हरियाणातूनही मोठ्या संख्येत घुसखोरांना परत पाठविण्यात आले ाअहे. याचबरोबर आसाम, महाराष्ट्र आणि राजस्थानात बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. यासंबधी केंद्रीय गृह मंत्रालयाने निर्देश जारी केले असून राज्य सरकारांकडुन देखील याप्रकरणी पूर्ण सहकार्य मिळत आहे. अधिकाऱ्यांनुसरा आतापर्यंत या प्रक्रियेत बॉर्डर गार्ड्स बांगलादेश देखील सहकार्य करत आहे.
ईशान्येतही प्रक्रियेला वेग
आसाम, त्रिपुरा आणि मेघालय यासारख्या राज्यांमध्ये प्रक्रिया वेगाने जारी आहे. विविध राज्यांमधून ताब्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांना वायुदलाच्या विमानांद्वारे बांगलादेशी सीमेनजीक आणले जात आहे. यानंतर त्यांना बीएसएफच्या स्वाधीन केले जातेय. बीएसएफकडुन या घुसखोरांना तात्पुरत्या शिबिरांमध्ये ठेवले जाते, काही तासांच्या ताब्यानंतर त्यांना सीमेद्वारे बांगलादेशात पाठविले जाते.