For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अन्न बिघडविण्याविरोधात कठोर नियम

06:39 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
अन्न बिघडविण्याविरोधात कठोर नियम
Advertisement

उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था / लखनौ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अन्न भेसळ आणि हेतुपुरस्सर अन्न बिघडविण्याच्या प्रकारांविरोधात कठोर नियमांची घोषणा केली आहे. यापुढे प्रत्येक खाद्यपेयगृहामध्ये स्पष्ट दिसेल अशा स्वरुपात त्या खाद्यपेयगृहाच्या किंवा खाद्यपेय केंद्राच्या मालकांची, चालकांची, व्यवस्थापकांची आणि प्रमुखांची नावे दर्शविली गेली पाहिजेत. त्याव्यतिरिक्त अशा खाद्यपेयगृहांमध्ये किंवा केंद्रांमध्ये काम करणारे वेटर्स, स्वयंपाकी आणि इतर कर्मचाऱ्यांनी मास्क आणि हातमोजे परिधान करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच हॉटेल्स आणि रेस्टॉरंटस् येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणेही त्यांनी अनिवार्य केल्याची घोषणा केली आहे.

Advertisement

गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेशात हेतुपुरस्सर अन्न बिघडविण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. सहारणपूर येथील एका रेस्टॉरंटमध्ये रोटीवर थुंकून ती ग्राहकाला दिली जात असल्याचा प्रकार दिसून आला. नंतर या रेस्टॉरंटच्या मालकाला अटक करण्यात आली. गाझियाबाद येथे फळांच्या रसात लघवी करुन असे मूत्रमिश्रित रस ग्राहकांना विकण्याचा प्रकार घडला. या दुकानाच्या मालकालाही अटक करण्यात आली आहे. जून महिन्यात नोयडा येथे फळांच्या रसात लाळ मिसळण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधितांना अटक करण्यात आली होती. हे प्रकार चुकून किंवा अपघाताने होत असून हेतुपुरस्सर होत आहेत, असे दिसून येत आहे. लोकांच्या धर्मभावना दुखाविण्यासाठी, तसेच त्यांच्या श्रद्धांचा अवमान करण्यासाठी हे प्रकार केले जात असल्याचाही आरोप आहे.

प्रकार बंद होणे आवश्यक

मलमूत्रासारखे मानवाने बाहेर टाकलेले पदार्थ अन्नात मिसळणे हे केवळ घृणास्पद नाही, तर ते आरोग्याला गंभीर धोका निर्माण करणारे कृत्य आहे. असे करणाऱ्या गुन्हेगारांना कठोरातले कठोर शासन होण्याचीही आवश्यकता आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पष्ट केले आहे.

दक्ष यंत्रणा स्थापन करणार

खाद्यपेय गृहांची झडती घेणारी, तसेच प्रत्येक खाद्य आणि पेय पदार्थांची सखोल चाचणी करणारी यंत्रणा राज्यात स्थापन केली जाणार आहे. प्रत्येक ढाबा, हॉटेल, गाडी, खाद्यपेय गृह किंवा केंद्र यांची कसून तपासणी केली जाणार आहे. तसेच या केंद्रांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचे पोलिस रेकॉर्ड ठेवले जाणार असून त्याची पार्श्वभूमी तपासली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

समाजवादी पक्षाच्या नेत्याला अटक

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या एका नेत्याला बनावट नोटा तयार केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या नेत्याकडे 5 लाख रुपयांच्या भारतीय बनावट नोटा आणि नेपाळच्या 3 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. ही माहिती, पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.