Ratnagiri News: जिल्ह्यात आज गौरी- गणपतींचे विसर्जन
सुमारे 1 लाखाहून अधिक गणपतींना देण्यात येणार निरोप
रत्नागिरी: जिह्यात घरोघरी आगमन झालेल्या लाडक्या गणरायाचा व त्यामागोमाग आलेल्या गौराईचा भक्तीमय वातावरणात पाहुणाचार झाल्यानंतर 2 सप्टेंबर रोजी निरोप देण्यात येणार आहे.
जिह्यात सुमारे 1 लाखाहून अधिक गणपतींचे विसर्जन होणार असून समुद्र किनाऱ्यावर गर्दी टाळण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरातील भाट्यो व मांडवी किनारी गौरी गणपतींचे विसर्जन करण्यात येणार आहे. प्रशासनाने पोलीस पाटलांनाही सूचना दिल्या आहेत.
रामनाका ते कॉँग्रेस भवन मार्गावर वाहतूक बंद राहणार
2 सप्टेंबर रोजी गौरी गणपती, 4 सप्टेंबर रोजी 9 दिवसांचे गणपती, 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी व 7 सप्टेंबर रोजी सार्वजनिक व खासगी गणेशमूर्तींचे मोठ्या संख्येने विसर्जन होणार आहे. त्यामुळे या दिवशी रामनाका-राधाकृष्ण नाका- गोखले नाका- विठ्ठल मंदिर- काँग्रेस भवन या मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली.
शहरातील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
शहरातील रामनाका-तेलीअळी नाका- आठवडा बाजार चौक-भुते नाका-मत्स्यालय- मांडवी समुद्र किनारा या पर्यायी मार्गावर वाहतूक सुऊ राहील. याबाबत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी वाहतूक विभागाला सूचना दिल्या आहेत.
त्या दिवशी बाजारपेठ परिसरात भाविकांची व ग्राहकांची वर्दळ असल्याने गणपती विसर्जनासाठी वाहने घेऊन येणाऱ्यांना आत प्रवेश देऊन अन्य वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
या मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून रामनाका-तेलीआळी नाका- आठवडा बाजारचौक- भुतेनाका मत्स्यालय -मांडवी समुद्र किनारा या मार्गावर वाहतूक सुऊ राहणार आहे. ही वाहतूक नियंत्रण सूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, ऊग्णवाहिका, शासकीय व मंत्री महोदय यांच्या दौ-याच्या अनुषंगाने परवानगी दिलेली वाहने यांना लागू होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
चिपळुणात 4 ठिकाणी कृत्रिम तलाव
नगर परिषदेकडून विसर्जन घाटाच्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली असून शहरातील चार ठिकाणी कृत्रिम तलाव देखील उभारले जाणार आहेत. शिवाय कर्मचारीदेखील तैनात असणार आहेत.
तालुक्यात 22767 घरगुती व 3 सार्वजनिक गणरायाचा समावेश आहे. चिपळूण शहरात 9905, अलोरेमध्ये 4500, तर सावर्डेमध्ये 8362 अशा 22767 इतक्या घरगुती तर शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग, वेस मारुती मंदिरात स्थानापन्न झालेल्या गणरायासह अलोरे परिसरातील 1 अशा तीन सार्वजनिक गणरायांना निरोप देण्यात येणार आहे. विसर्जनादरम्यान ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुका काढण्यात येणार आहेत.
विसर्जन कालावधीत अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे.