ड्रग्ज नियंत्रणासाठी कठोर पावले
गृहमंत्री जी. परमेश्वर यांची विधानपरिषदेत माहिती
बेळगाव : काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक राज्य ड्रग्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार गृह खात्याकडून ड्रग्ज विरोधात कठोर पावले उचलली आहेत. अमली पदार्थांचे सेवन व तस्करी विरोधात अमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. दावणगेरे जिल्ह्यासह प्रत्येक जिल्ह्यात ड्रग्ज विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. ड्रग्ज सेवनाच्या अधीन झालेल्या मुलांचे भविष्य वाचविण्यासाठी त्यांच्यात जागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी विधानपरिषदेत दिली.
गुरुवारी विधानपरिषद सदस्य अब्दुल जब्बार यांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. राज्यात ड्रग्ज प्रकरणे वाढली आहे. दावणगेरे जिल्ह्यात शालेय व महाविद्यालयीन मुलांमध्ये ड्रग्ज सेवनाचे प्रमाण वाढले आहे. गृह खाते बेंगळूरसह इतर भागात याविरोधात कडक कारवाई करत आहे. मात्र काही जिह्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. राज्यातील विविध ठिकाणी ड्रग्ज तस्करीत वाढ झाली असून यामध्ये स्थानिक अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा प्रश्न जब्बार यांनी उपस्थित केला.
विदेशी विद्यार्थ्यांविषयी दुतावासाला माहिती
त्यावर उत्तर देताना गृहमंत्री डॉ. परमेश्वर म्हणाले, उपाययोजना राबवूनही राज्यात अमली पदार्थांची विक्री सुरू आहे. हे जरी खरे असले, तरी राज्य सरकार त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलत आहे. गेल्या तीन वर्षांत हजारो किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले असून 200 किलो ड्रग्ज नष्ट करण्यात आले आहे. राज्यातील ड्रग्ज तस्करीमध्ये विदेशातील विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे आढळून आले आहे. 3 हजार विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यात आली असून संबंधितांची माहिती त्या त्या देशांच्या दूतावासाकडे पाठवून दिली आहे. त्याचबरोबर सदर विद्यार्थी राहत असलेल्या घरमालकांना नोटीस बजाविण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
अमली पदार्थविरोधी कृतीदल स्थापन
दावणगेरे जिल्ह्यात ड्रग्जच्या सेवनात वाढ झाली असून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी ड्रग्जचे सर्वाधिक सेवन करत असल्याचे आढळून आले आहे. अशी परिस्थिती इतर जिल्ह्यातही असू शकते. बेंगळूरच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ड्रग्जवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलण्यात येत आहे. त्यानुसार अमली पदार्थविरोधी कृतीदलाची स्थापना करून 56 पदे निर्माण करण्यात आली आहेत. यामध्ये कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांसह 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली. या दलाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जागृती करण्यात येणार असून पुढील दिवसात याचे चांगले परिणाम दिसून येतील, असे परमेश्वर म्हणाले.