आधुनिक उपकरणांच्या माध्यमातून कारागृहांमध्ये कडक तपासणी
सर्वच कारागृहांना आधुनिक यंत्रोपकरणांचे वितरण : प्रशिक्षणाचेही आयोजन : 100 हून अधिक अधिकारी-कर्मचाऱयांचा सहभाग
प्रतिनिधी /बेळगाव
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱयांना सुरक्षा उपकरणांच्या वापराविषयी दोन दिवस कार्यशाळा भरविण्यात आली होती. मध्यवर्ती कारागृह आणि छत्तीसगढ येथील लाईफलाईन सेक्मयुरिटी अँड सिस्टिम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात 100 हून अधिक अधिकारी व कर्मचाऱयांनी भाग घेतला होता. कारागृहातील गैरप्रकार रोखण्यासाठी आधुनिक उपकरणे पुरविण्यात आली असून यापुढे कारागृहात तीन टप्प्यात तपासणी होणार आहे.
कारागृहाचे उत्तर विभाग उपमहानिरीक्षक आनंद रेड्डी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मुख्य अधीक्षक कृष्णकुमार उपस्थित होते. लाईफलाईन सेक्मयुरिटी संस्थेचे सर्व्हिस मॅनेजर सोमनाथ व इंजिनियर शशिकांत हेही शिबिरात सहभागी झाले होते. रोपटय़ाला पाणी घालून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना आनंद रेड्डी म्हणाले, कारागृहात बेकायदा वस्तूंचा वापर होऊ नये यासाठी आधुनिक उपकरणे महत्त्वाची ठरणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त उपकरणांचे वितरण करण्यात येत आहे. मात्र, ही उपकरणे हाताळणे महत्त्वाचे ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले.
कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार म्हणाले, कारागृहात बेकायदा कारवाया थोपविण्यासाठी अनेक कठोर नियम जारी करण्यात आले आहेत. बेकायदा कारवाया करणाऱया कैद्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. अधिकारी व कर्मचाऱयांनी प्रामाणिकपणे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नजर ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
एन. एल. जे. डी., एच. एच. एम. डी., डी. एस. एम. डी., डब्ल्यू. डी. एम. डी. आदी उपकरणे बेळगावसह विजापूर, धारवाड, गदग, हावेरी, कारवार, बागलकोट येथील कारागृहांबरोबरच बैलहोंगल, गोकाक, हल्याळ, जमखंडीतील कारागृहांनाही पुरविण्यात आली आहेत. या उपकरणांची हाताळणी कशी करायची, यासाठी एस. निजलिंगप्पा साखर संस्थेच्या सभागृहात प्रशिक्षण शिबिर झाले. यावेळी धारवाड कारागृहाचे अधीक्षक मरीगौडा, बेळगावचे साहाय्यक अधीक्षक शहाबुद्दीन के., केएसआयएसएफचे पोलीस निरीक्षक अरुण डी. व्ही., शशिकांत यादगुडे आदी उपस्थित होते.