For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ध्वनी प्रदूषणावर कडक कारवाई

01:03 PM Jan 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
ध्वनी प्रदूषणावर कडक कारवाई
Advertisement

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष मार्टिन्स यांचा इशारा : आयोजकांना रात्री 10 नंतर संगीत बंद करावेच लागेल,तक्रारींसाठी भ्रमणध्वनी 8956487938 केला जाहीर

Advertisement

पणजी : अमर्याद ध्वनी प्रदूषण झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. तक्रारीसाठी मंडळाने 8956487938 हा मोबाईल नंबर जाहीर केला असून तेथे तक्रारी नोंदवण्याचे आवाहन केले आहे. मंडळाचे अध्यक्ष लेविन्सन मार्टिन्स यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, वरील नंबरवर तक्रार आल्यानंतर ती तातडीने उपविभागीय पोलिस अधिकारी, उपजिल्हाधिकारी व स्थानिक पोलिसस्थानक यांना पाठवली जाणार असून त्यांनी तक्रारीची दखल घेऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणी जावे आणि कारवाई करावी. ध्वनी प्रदूषण जास्त होत असलेल्या किनारपट्टी भागात 38 ठिकाणी ऑनलाईन स्वरुपात देखरेख ठेवणारी यंत्रणा असून ती स्वयंचलित आहे. आवाजाची मर्यादा ओलांडताच कारवाईची प्रक्रिया सुरु होते, असा दावा मार्टिन्स यांनी केला आहे.

चार महिन्यात 36 जणांवर कारवाई

Advertisement

धार्मिक सण, उत्सव, विवाह, पार्टी, अन्य समारंभ, मिरवणूक इत्यादी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमातून ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. ध्वनी प्रदूषण झालेच तर ते सहन केले जाणार नाही. प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जाणार असून काटेकोरपणे तपासणी केली जाणार आहे. दोषी असणाऱ्यांवर कारवाई होणारच असे त्यांनी ठामपणे सांगितले. गेल्या चार महिन्यात 36 जणांवर कारवाई करण्यात आली असून सुमारे रु. 20 लाखांचा दंड वसूल केल्याची माहिती त्यांनी दिली.

15 दिवस मिळणार संगीतास सूट 

कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमातील संगीत रात्री 10 वा. बंद करणे भाग आहे. अधिसूचित केलेल्या निवडक 15 दिवसात रात्री 10 नंतर संगीत चालू शकते. इतर दिवसात रात्री 10 नंतर संगीत चालू राहिले तर कारवाई होणारच असेही मार्टिन्स यांनी बजावले. ध्वनी मर्यादेचे उल्लंघन झाले तर रु. 20 हजार ते 1 लाखपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो, असेही त्यांनी नमूद केले. एकापेक्षा जास्तवेळा उल्लंघन झाले तर संबंधित हॉटेल्स, आस्थापनांचा परवाना निलंबित होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हवेचा दर्जा चांगला, समाधानकारक

वास्को, बायणा, डिचोली आणि कुंडई येथे किरकोळ हवा प्रदूषणाची टक्केवारी नोंद झाल्याची माहिती मार्टिन्स यांनी दिली आहे. गोव्यात एकूण 18 ठिकाणी हवा प्रदूषणाची नोंदणी करणारी केंद्रे आहेत. त्यापैकी वरील चार ठिकाणी किरकोळ प्रदूषण होत असल्याची नोंद झाली असून गोव्यात इतर सर्व ठिकाणी हवेचा दर्जा चांगला आणि समाधानकारक वर्गवारीत असल्याचे त्यांनी नमूद केले. बेतकी, खांडोळा, आमोणे येथे ग्राफाईटचे काही अंश हवेतून आढळून आले असून ते कोठून येतात त्याची कारणे कोणती? याचा अभ्यास मंडळातर्फे चालू आहे. त्यावर उपाययोजना करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे, असेही म्हणाले.

Advertisement
Tags :

.