दरडींप्रकरणी सर्व दोषींवर करणार कडक कारवाई
केंद्रीय महामार्ग वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचा इशारा : चौकशीसाठी खास पथक दाखल, आज होणार पाहणी
पणजी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पेडणे विभागात कोसळलेल्या दरडींची केंद्रीय महामार्ग व अवजड वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गंभीर दखल घेतली आहे. आपल्याकडे बरीच माहिती आलेली आहे. राष्ट्रीय महामार्ग संदर्भातील खास पथक गोव्यात आले असून ते आज शुक्रवारी घटनास्थळी जाऊन पाहणी व अभ्यास करणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी कऊन दोषींविऊद्ध कारवाई कऊ, असे त्यांनी काल गुरुवारी सायंकाळी मोपा विमानतळ प्रकल्पावरील सार्वजनिक कार्यक्रमात जाहीर केले.
मोपा विमानतळ प्रकल्पाच्या रिंगरोड उड्डाणपुलाचे उद्घाटन केल्यानंतर जाहीर कार्यक्रमात त्यांनी वरील भाष्य केले. यावेळी व्यासपीठावर भाजपचे गोव्यातील सर्व नेते होते. गडकरी म्हणाले की, ज्या दरडी कोसळल्या त्याबाबतच्या तक्रारी आपल्याकडे आलेल्या आहेत. आपण त्याविषयक सविस्तर माहिती मिळविली असून आपण हे प्रकरण फार गंभीरपणे घेतोय. आपल्याबरोबर राष्ट्रीय महामार्गाचे खास पथक आलेले आहे. ते पाहणी करणार आहे. गरज पडल्यास या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. चौकशीमध्ये जर कोणी सापडले तर कडक कारवाई करण्यास मागे राहणार नाही, असा इशाराही गडकरी यांनी दिला आहे.