ठोस कारवाई केली पाहिजे
सांगली :
केवळ कागदी घोडे नाचवू नका, ठोस कारवाई करा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी चौथ्या टास्क फोर्सच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली.
टास्क फोर्सच्या गत सप्ताहातील कारवाईचा आढावा घेतला. आठवडयाभरात अंमली पदार्थ विरोधी एकही कारवाई नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय बंद कारखाने तपासणी सुरू असून मेडिकल दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.
यावर पालकमंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना केवळ कागदी घोडे नाचवू नका, ठोस कारवाईची अपेक्षा असल्याचे सुनावले. यामुळे उपस्थित अधिकारी नरमले. याशिवाय व्यसनमुक्ती, नशामुक्तीसाठी, अंमली पदार्थ विरोधात शाळा, महाविद्यालयात प्रबोधन करण्यासाठी गीतस्पर्धेची घोषणा करण्यात आली असून त्यासाठी 51 हजारांचे बक्षीस देण्याची घोषणा पालकमंत्री पाटील यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, आयुक्त शुभम गुप्ता, अप्पर अधीक्षक रितू खोखर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.) च्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बीरजे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, यासह टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.
राज्यात अंमली पदार्थाविरोधी जिह्याचे आदर्श मॉडेल तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत, याचा पुनरूच्चार पालकमंत्री पाटील यांनी केला. गत आठवड्यामध्ये अंमली पदार्थ साठे सापडण्याची नवीन घटना आढळली नाही. मात्र, जे साठे सापडले, त्यावरील कायदेशीर कारवाया गांभिर्याने सुरू आहेत. बंद कारखान्यांची तपासणी सुरू आहे. माध्यमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून प्रत्येक शाळेत प्रबोधन उपक्रम सुरू करत असल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.
अंमली पदार्थ घटनेतील दोषींना कठोर शासन व्हावे, कायद्याच्या कचाट्यातून दोषी सुटू नयेत, या अनुषंगाने अशा प्रकरणात चांगले वकील द्यावेत, असे सूचित करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, विद्यार्थी दशेपासूनच अंमली पदार्थांचे दुष्परिणाम रुजविण्याची गरज आहे.
- मनपा क्षेत्रातील डार्क स्पॉट शोधा
महानगरपालिका क्षेत्रातील डार्क स्पॉट्स शोधून काढावेत व त्या ठिकाणी कोणतीही दुष्कृत्ये होणार नाहीत, यासाठी उपाययोजना कराव्यात, जेवणाच्या सुटीत विद्यार्थी शाळा कुंपणातून बाहेर जाणार नाहीत, यासाठी शाळांनी खबरदारी घ्यावी अशा सुचना पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्या. अंमलीपदार्थ प्रतिबंधक उपाययोजनांसाठी स्थापन टास्क फोर्सने केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. उर्वरित बंद कारखाने तपासणी कालमर्यादेत पूर्ण करावी, असेही त्यांनी यावेळी सूचित केले.