For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सरकारच्या मालमत्तेचा गैरवापर केल्यास कठोर कारवाई

12:26 PM Nov 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
सरकारच्या मालमत्तेचा गैरवापर केल्यास कठोर कारवाई
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा इशारा : नव्या कुटबण जेटीचे उद्घाटन : बोटमालकांनी एकजुटीने रहावे

Advertisement

मडगाव : सरकारच्या मालमत्तेचा गैरवापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत असे प्रकार बंद होणार नाही. यापुढे सरकारच्या मालमत्तेचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल रविवारी कुटबण येथे नव्या मच्छीमारी जेटीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना दिले. कुटबण येथे नवी जेटी बांधून दोन-अडीच वर्षे पूर्ण झाली होती. मात्र, तिचे उद्घाटन लांबणीवर पडले होते. या जेटीचा गैरवापर केला जात होता. सप्टेंबर महिन्यात या ठिकाणी कॉलराचा उद्रेक झाला आणि काही कामगार दगावले, तेव्हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी भेट देऊन पाहणी केली होती.

या जेटीचा गैरवापर केला जात असल्याने तो बंद करण्याचा आदेश त्यावेळी दिला होता. या जेटीजवळ मोठ्या प्रमाणात विनावापर असलेल्या बोटी नांगरून ठेवल्या होत्या, त्या हटविण्याचा आदेश दिला होता. तसेच जेटीवर मोठ्या प्रमाणात मासळी पकडण्याची जाळी टाकण्यात आली होती. ती सर्व हटविण्याचा आदेश दिला होता. या कामाची जबाबदारी मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्यावर देण्यात आली होती. त्याप्रमाणे विनावापर असलेल्या बोटी हटविण्यात आल्या आहेत. तेथील डिंग्याही हटविण्यात आल्या असून मासळी पकडण्याची जाळीही हटविण्यात आली आहेत, त्यामुळे जेटी स्वच्छ झाली आहे. संपूर्ण गोव्यात ही मच्छीमार जेटी सर्वांत मोठी असून या ठिकाणी सुमारे 450 मच्छीमार बोटींची व्यवस्था होऊ शकते. या जेटीची देखभाल करण्याची जबाबदारी सरकारची असली तरी बोटमालकांनीही जेटीची देखभाल घेतली पाहिजे, असे मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले.

Advertisement

न्यायालयात याचिका दाखल केल्याने काम रेंगाळले

कुटबण जेटीसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने काम बराच काळ रेंगाळले. तरीसुद्धा न्यायालयाकडून मान्यता मिळाल्याने जेटीचे बांधकाम पूर्ण झाले. अद्याप येथील काही कामे शिल्लक आहेत. ती उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने पूर्ण करता येत नाही. ज्या व्यक्तीने याचिका दाखल केली आहे, त्याला बोटमालकांनी जाब विचारला पाहिजे. कारण, त्याच्या याचिकेमुळे काम हाती घेणे शक्य होत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

काँग्रेसने मच्छीमारांना कधीच प्राधान्य दिले नाही

वेळ्ळी मतदारसंघाचा माजी आमदार हा मंत्री होता. मात्र, त्याने कधीच कुटबण जेटीला भेट देऊन समस्या जाणून घेतल्या नाही. त्यानंतर आमदार झालेल्या व्यक्तीच्या मच्छीमार बोटी होत्या, त्यानेही कुटबण जेटीवरील समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले नाही. काँग्रेस पक्षाने कधीच मच्छीमारांकडे गांभीर्याने पाहिले नाही, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

कामगारांच्या आरोग्याची काळजी बोटमालकांनी घ्यावी

मच्छीमार बोटीवर काम करण्यासाठी येणाऱ्या कामगारांचे अगोदर आरोग्य कार्ड करावे तसेच त्यांची वैयक्तिक संपूर्ण माहिती पोलिसांना द्यावी. ज्या बोटी चार-पाच दिवस खोल समुद्रात राहतात, त्यांनी सक्तीने बोटीवर शौचालयाची व्यवस्था करावी तसेच बोटीवर काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची काळजी बोटमालकांनी घ्यावी असे मुख्यमंत्री म्हणाले. या कार्यक्रमाला मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, आमदार व्रुझ सिल्वा, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस, मच्छीमार खात्याच्या संचालिका याश्विनी बी, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोठवळे, उदय प्रभुदेसाई, मामलेदार प्रताप नाईक गांवकर तसेच कुटबण बोट मालक संघटनेचे अध्यक्ष पेट्रीक डिसोझा इत्यादी उपस्थित होते.

बोटमालकांनी एकजुटीने रहावे

यावेळी बोलताना मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर म्हणाले की, बोटमालकांमध्ये दुफळी असते, तेव्हा त्यांना सहकार्य करणे कठीण जात असते. बोटमालकांनी एकजूट ठेवली पाहिजे तरच त्यांच्या समस्या सोडविणे शक्य होत असते. कुटबण येथील बोटमालकांनी एकजूट ठेवावी. सरकारचा त्यांना नेहमीच पूर्ण पाठिंबा राहील.

बोटमालकांच्या सहकार्यामुळे काम पूर्ण

कुटबण बोटमालक संघटनेने पूर्ण सहकार्य दिल्यानेच येथील कॉलरा नियंत्रणात आणणे शक्य झाले. तसेच येथील जेटीची स्वच्छता करताना तसेच विनावापर असलेल्या बोटी हटविताना बोटमालकांनी पूर्ण सहकार्य केल्यानेच आज नव्या जेटीचे उद्घाटन करणे शक्य झाल्याचे पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा म्हणाले.

Advertisement
Tags :

.