पंचगंगा प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कठोर करवाई
पालकमंत्री प्रकाश आबिटकर
उद्योग पेक्षा जनहिताला प्राधान्य
प्रदूषणाबाबत लवकरच बैठक
कोल्हापूर
पंचगंगा नदी प्रदूषण हा गंभिर विषय बनत चालला आहे. उद्योग व्यवसाय वाढले पाहिजे पण नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे. उद्योगापेक्षा जनहित महत्वाचे आहे. त्यामुळे प्रदूषण करणाऱ्यांवर घटकांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी, संबंधित औद्योगिक संस्था यांचे प्रतिनिधी यांच्यासोबत पंचगंगा प्रदूषणासंदर्भात बैठक घेणार असून या बैठकीनंतर नक्कीच परिणाम दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती ताराराणी सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, पंचगंगा प्रदुषणासोबत महापूर हे दोन्ही विषय आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत. याबाबत चर्चा झाली आहे. महापूरावर नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून कर्ज मंजूर असून त्यांचे आराखड्याचे काम सूरू आहे. या आठवड्यात पंचगंगा प्रदूषणासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या दालनात सर्व लोकप्रतिनिधीसोबत बैठक घेतली जाईल. सर्वांच्या सूचना घेवून निर्णय घेतले जातील. जिल्ह्यात तीन मोठया औद्योगिक संस्थांचे सांडपाणी नदीत मिसळत आहेत. त्यांनाही बैठकीला बोलवले जाणार आहे.
आपणासाठी उद्योगापेक्षा लोक महत्वाचे आहेत. लोकांचे आरोग्य महत्वाचे आहे. त्यामुळे कठोर निर्णय घ्यावे लागतील परिणामी औद्योगिक संस्थेतील कंपनीना वाईट वाटेल परंतू त्यांच्या पेक्षा जनहित महत्वाचे आहे. त्यामुळे पंचगंगा प्रदूषणाची या आठवड्यात बैठकीनंतर प्रदूषणाबाबत नक्कीच रिजल्ट दिसतील, असेही पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले. जि.प प्रमाणे मनपा शाळांना अधिकचा निधी देणार आहे. शहरातील शाळांची पटसंख्या वाढविण्याची सूचनाही प्रशासकांना दिल्या आहेत.
सह पालकमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, जोतिबा मंदिर विकास आराखडा परिपूर्ण देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासह कोल्हापूरच्या विकासकामासाठी जास्तीचा निधी मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. काही परिसरात प्रॉपर्टीकार्डचा प्रश्न आहे. यासाठी नाविण्यपूर्ण योजनेतून निधी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. कोल्हापुराचा विकास करणे हेच ध्येय येथील आमदारासह पालकमंत्री आबिटकर व आपला आहे. दोघे मिळून विकासकामांसाठी प्रयत्न केले जातील. कोल्हापूर शहरातील कचऱ्यासह अन्य प्रश्नाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर सहमंत्री मिसाळ म्हणाल्या, शहरातील कचरा उठावासाठी आणखीन 35 टिपरसाठी निधी दिला जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या पुढील बैठकीपूर्वी शहरातील विकासकामांबाबत ठोस कार्यवाही झाल्याचे दिसून येईल.
‘जीबीएस’ नियंत्रणात
जीबीएस आजाराचे पुण्यात रूग्ण वाढल्याने या आजाराची चर्चा राज्यभार सर्वत्र झाली. आठवड्यात आजारात वाढ होण्याची संख्या कमी आहे. हा आजार संसर्गजन्य नसल्याने भिती बाळगण्याची गरज नाही. याबाबत आरोग्य मंत्रालयाने सूची जाहीर केली आहे. ‘घर टू घर’ सर्व्हे केला जात आहे. रूग्णांची संख्या नियंत्रणात असल्याचे पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले.
स्वच्छ पाण्यासाठी कडक कायदा करणार
भविष्यात पाण्याचा स्त्राsत सुद्धा वेगवेगळया आजारांचे कारण असू शकतो. यावर योग्य निर्बंध करण्यासाठी अत्यंत कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. लवकरच याबाबत कडक कायदा करणार असल्याचे पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले. ते म्हणाले, आरोग्य विभागाकडे सर्व साथीचे नियंत्रण करण्याची जबाबदारी आहे. परंतू या विभागाकडे अधिकचे अधिकार नाहीत. मॅनीटरींगची सिस्टम सक्षम नसल्याने आरोग्य विभागाला नागरिकांना केवळ हात धुवा, पाणी गरम प्याय, अशा सूचना देण्या पलिकेकडे या विभाग काम नव्हते. दोन दिवसांत यासंदर्भात बैठक घेणार आहे. नवीन कायदाची निर्मिती केली जाईल.