For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

योग, आयुष उपचारपद्धत बळकट करा

12:43 PM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
योग  आयुष उपचारपद्धत बळकट करा
Advertisement

जि. पं. सीईओ राहुल शिंदे : आयुष विभागाची प्रगती आढावा बैठक

Advertisement

बेळगाव : जिल्ह्यातील सर्व शासकीय, खासगी व अनुदानित शाळांमध्ये योग व आयुष उपचार पद्धतींचे प्रभावी बळकटीकरण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत. जिल्ह्यातील शारीरिक शिक्षण शिक्षकांना आयुष विभागामार्फत योगाचे प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना नियमितपणे योगासन, आरोग्यदायी जीवनशैली आणि औषधी वनस्पतींबाबत प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी हा उपक्रम प्रभावीपणे राबविणे आवश्यक असून अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशा सूचना जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिल्या.

मंगळवारी जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित आयुष विभागाच्या प्रगती आढावा बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, प्रत्येक आयुष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील किमान तीन निवासी शाळा दत्तक घ्याव्यात. त्या शाळांमधील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी, औषध वितरण, योग प्रशिक्षण व आरोग्यविषयक माहिती देऊन संबंधित माहिती संकलित करावी. आयुष उपचारपद्धती मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉक्टरांनी लोकप्रतिनिधी, नागरिकांशी समन्वय साधून या उपचार पद्धतींचा व्यापक प्रसार करावा, असेही त्यांनी सांगितले.बैठकीच्या प्रारंभी जिल्हा आयुष अधिकारी डॉ. श्रीकांत सुणधोळी यांनी जिल्ह्यातील आयुष विभागाची सद्य:स्थिती, उपलब्ध मनुष्यबळ, ऊग्णालये व उपचार केंद्रांची माहिती सादर केली. तसेच 2025-26 या वर्षात राबविण्यात आलेल्या विविध आयुष योजनांचा आढावा त्यांनी घेतला. केंद्र पुरस्कृत योजनांच्या माध्यमातून आयुष विभागाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात माहिती, शिक्षण व संवाद कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्याची गरज व्यक्त केली.

Advertisement

पंचकर्म उपचाराबद्दल कौतुक

जिल्हा व तालुकास्तरावरील आयुष ऊग्णालयांमध्ये पंचकर्म व अग्निकर्म यांसारख्या उपचार सुविधा दिल्या जात असल्याबद्दल त्याचे कौतुक करण्यात आले. तसेच बेळगाव येथील जिल्हा आयुष ऊग्णालयात ‘जीवक’ नेत्र विभागांतर्गत ‘आशा किरण-दृष्टि केंद्र’ विस्तारण्यात आल्याबद्दलही समाधान व्यक्त केले. याशिवाय जिल्ह्यातील कोणत्याही ऊग्णालयात औषधांची कमतरता भासू नये, यासाठी दक्षता घेण्याचेही निर्देश देण्यात आले. बैठकीस राज्य आयुष विभागाचे समन्वय अधिकारी डॉ. चंद्रशेखर सिद्दापूर यांच्यासह जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.