विठुरायाच्या प्रवेशद्वारावर फेरीवाल्यांचीच गर्दी
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्न
पंढरपूर
महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. मंदिर परिसरातील व्हिआयपी रस्त्यावर आणि मंदिराच्या प्रवेशदारातच फेरीवाल्यांनी अगदी बाजार मांडल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसत आहे.
मंदिर परिसर संवेदनशील आहे. येथे दररोज हजारो भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत असतात. येथे येणाऱ्या भाविकांची आणि मंदिराची सुरक्षा महत्त्वाची असूनही पोलिसांचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले.
मंदिराच्या सुरक्षेसाठी २४ तास पोलिसांचा खडा पहारा आहे. शिवाय खास मंदिराच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलिस निरीक्षक आणि पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची असतानाही पोलिसांचे या सगळ्याप्रकाराकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
मंदिर परिसर व परिसरातील रस्त्यावर फेरी वाल्यांनी बाजार मांडण्यास, गर्दी करण्यास, मनाई असतानाही फेरीवाल्यांकडून मात्र या नियमांचे राजरोसपणे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे मंदिराच्या सुरक्षिततेबद्दल भाविकांमधूनही प्रश्न विचारला जात आहे.