खडेबाजारमध्ये रस्त्यावरच व्यापार, वाहतुकीस अडथळा
महापालिकेने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी : नागरिकांना समस्या 19
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाला (सीबीटी) जाण्यासाठी असलेल्या रस्त्यांवरच काही व्यावसायिकांकडून माल मांडून व्यापार सुरू असल्यामुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अतिक्रमणामुळे रस्त्याची ऊंदी कमी होत असून दिवसभर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालक, बसप्रवासी, तसेच पादचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई करण्यात येत असली तरी काही दिवसांतच पुन्हा रस्त्यावर व्यापार सुरू होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
सीबीटी हा शहरातील सर्वाधिक वर्दळीचा भाग असून जिल्ह्याच्या विविध भागांतून, तसेच राज्याच्या इतर भागांतून येणाऱ्या हजारो प्रवाशांची येथे दररोज मोठी गर्दी असते. खडेबाजारसह बसस्थानकाबाहेर रिक्षा, खासगी वाहने, दुचाकी व मालवाहू वाहनांची सतत ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत काही व्यापाऱ्यांनी रस्त्याकडेला, तसेच काही ठिकाणी थेट रस्त्यावरच आपला माल मांडल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी झाली आहे.
विशेषत: सकाळी कार्यालयीन वेळेत आणि सायंकाळी गर्दीच्यावेळी या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. वाहने संथगतीने सरकत असल्याने प्रवाशांचा वेळ वाया जात असून अनेकदा अडथळ्यांचा सामना करावा लागतो. पादचाऱ्यांसाठी असलेले पदपथही व्यापाऱ्यांनी अडविल्याने नागरिकांना थेट रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून महिला, ज्येष्ठ नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
महापालिका, वाहतूक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. रस्त्यावर सुरू असलेला व्यापार तातडीने हटवून रस्ते मोकळे करण्यात यावेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून सातत्याने देखरेख ठेवावी. सीबीटी परिसर हा शहराचा प्रमुख प्रवेशद्वार असल्याने येथील वाहतूक सुरळीत ठेवणे आणि नागरिकांना सुरक्षित व अडथळामुक्त मार्ग उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची मागणी होत आहे.