For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कन्नडसक्ती विरोधात आता रस्त्यावरील आंदोलन

10:57 AM Jan 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
कन्नडसक्ती विरोधात आता रस्त्यावरील आंदोलन
Advertisement

हुतात्मा दिन गांभीर्याने पाळणार : शहर म. ए. समितीची बैठक

Advertisement

बेळगाव : कन्नड सक्तीविरोधात आंदोलन करताना बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळला जातो. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही हुतात्मा दिन पाळला जाणार आहे. तसेच कर्नाटक सरकारकडून पुन्हा एकदा कन्नड सक्ती केली जात आहे. त्यामुळे याविरोधात आता रस्त्यावरची लढाई लढणे गरजेचे आहे, असे मत सोमवारी आयोजित शहर म. ए. समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले. सोमवारी शहर म. ए. समितीची बैठक समिती नेते बी. ओ. यतोजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जगदीश कुंटे यांनी सीमाप्रश्नावर आधारित काढलेल्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरविण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

त्याचबरोबर राम मंदिराच्या उद्घाटनादिवशी म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली एखाद्या ठिकाणी महाआरती करावी, अशी सूचना मांडण्यात आली.   मराठी भाषिक व्यापारी, उद्योजक यांना लक्ष्य केले जात असून कानडी फलकांची सक्ती केली जात आहे. याविरोधात आता म. ए. समिती रस्त्यावर उतरणार आहे. प्रशासनाने वेळीच या प्रकारांना आळा न घातल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी मालोजी अष्टेकर, रणजीत चव्हाण-पाटील, प्रकाश मरगाळे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, शिवराज पाटील, महादेव पाटील, सागर पाटील, मदन बामणे, अॅड. अमर येळ्ळूरकर, अनिल पाटील, प्रशांत भातकांडे, मोतेश बारदेशकर, शिवाजी जाधव यांच्यासह इतरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने समिती कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

म. ए. समितीतर्फे आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

दुराभिमानी संघटनांकडून बेळगावमधील मराठी फलकांना लक्ष्य केले जात आहे. तसेच मराठी भाषिक व्यापाऱ्यांना विनाकारण त्रास करण्याचा प्रयत्न सुरू असून याला आळा घालावा, या मागणीसाठी मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवार दि. 9 जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे. सकाळी 11 वाजता सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमावे, तसेच ज्या व्यापाऱ्यांना महानगरपालिकेकडून कन्नडसक्तीसाठी नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत, त्यांनी त्या म. ए. समितीकडे जमा कराव्यात, असे आवाहन करण्यात आले.

शहर म. ए. समितीची पुनर्रचना

कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची पुनर्रचना केली जाणार आहे. 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन झाल्यानंतर 281 कार्यकर्त्यांची व्यापक बैठक होणार असून त्यानंतर सर्वांच्या चर्चेतून नवीन पदाधिकारी निवडले जाणार आहेत. सोमवारी शहर म. ए. समितीने 281 कार्यकर्त्यांच्या नावांची यादी मदन बामणे यांच्याकडे सुपूर्द केली.

Advertisement
Tags :

.