सावंतवाडीत भटक्या कुत्र्यांची दहशत
सावंतवाडी -
सावंतवाडी शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून शहरातील कंठक पाणंद येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भटके कुत्रे असून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या , लहान मुलांच्या अंगावर हे श्वान धाऊन येत असल्याने तेथील परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे. शहरातील कंठक पाणंद रस्त्याच्या परिसरात महाविद्यालय ,शाळा असल्याने या रस्त्यावर शालेय विद्यार्थ्यांची तसेच युवकांची वर्दळ कायम असते. याठिकाणी भटक्या कुत्र्यांचे टोळके नागरिकांचा पाठलाग करीत असल्याचे निदर्शनास येत असून त्यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कुत्र्याच्या हल्ल्यात एखादा नागरिक जखमी झाल्यास त्याला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित होत असून स्थानिक नागरिकांनी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडे या गंभीर विषयावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे .