नगरसेवकाचा पाय कुत्र्याने धरला अन् प्रशासनाचा डोळा उघडला; शेवटी नगरसेवकाची कातडीच ठरली मौल्यवान
सुनील पाटील
आष्टा (सांगली): गेल्या कित्येक महिन्यांपासून आष्टा शहरातील गल्लोगल्ली भटक्या कुत्र्यांची दहशत सुरू होती. लहान मुले, महिला, वृद्ध आणि तरुण अशा कित्येक सर्वसामान्य नागरिकांच्या पायांचा या कुत्र्यांनी लचके तोडले होते. तरी पालिका प्रशासनाचे डोळे उघडले नव्हते. कुत्र्यांनी नागरिकांचे लचके तोडले तरी प्रशासनासाठी तो एक किरकोळ विषय होता आणि अधिकारी मस्तपैकी वातानुकूलित केबिनमध्ये ताणून देऊन झोपेचे सोंग घेत होते.
मात्र, म्हणतात ना, 'भगवान के घर देर है, पर अंधेर नही!' अखेर भटक्या कुत्र्यांच्या एका सुजाण टोळक्याने थेट नगरसेवकालाच लक्ष्य केले, तसेच माजी नगराध्यक्षांच्या सासूलाही लक्ष केले आणि पालिका प्रशासनाच्या झोपेची झिंग उत्तरवली. सामान्यांचं रक्त स्वस्त, पण मेहेरबान महोदयांची कातडी महाग हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले. नगरसेवकाला आणि माजी नगराध्यक्षांच्या सासूला कुत्रा चावल्याची ऐतिहासिक घटना घडताच, जी जीवरक्षक मोहीम सर्वसामान्यांसाठी महिने न महिने सुरू झाली नव्हती, ती मोहीम २४ तासांत युद्धपातळीवर सुरू झाली आहे.
नगरसेवकाचा पिच्छा पुरवणाऱ्या त्या कुत्र्याचे नागरिकांनी मनातल्या मनात आभार मानले आहेत. कुत्र्याने एका फटक्यात जे काम केले, ते
प्रशासनाला हजारो विनंत्या करूनही जमले नव्हते, अशी उपरोधिक चर्चा आता शहरात रंगली आहे. फक्त नगरसेवकाच्या प्रभागातील कुत्रे पकडण्या इतकीच प्रशासनाची निष्ठा मर्यादित आहे का? सामान्यांच्या जखमांची किंमत काय?, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
आता उशिरा का होईना, साहेबांच्या कृपेने पालिका प्रशासनाला जाग आल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. परंतु, ही तत्परता फक्त खास प्रभागापुरती मर्यादित न ठेवता, शहरातील सर्वच्या सर्व प्रभागांतील कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जनता करत आहे. अन्यथा, पालिका प्रशासनाला जागे ठेवण्यासाठी नागरिकांना प्रत्येक प्रभागात एका नगरसेवकाला कुत्र्यांसमोर उभे करावे लागेल की काय, असा बोचरा सवाल आता विचारला जात आहे.
अन् प्रशासनाचा डोळा उघडला
गेल्या कित्येक महिन्यांपासून सर्वसामान्य नागरिक कुत्र्यांच्या भीतीने जगतात, तेव्हा प्रशासनाला तो किरकोळ विषय वाटायचा. पण कुत्र्याने योग्य जागी दात बसवताच यंत्रणा तत्काळ कामाला लागली. भटक्या कुत्र्याने एका चाव्यात जे काम केले, ते आम्ही हजारो अर्ज देऊनही करू शकलो नव्हतो.
- एक त्रस्त नागरिक, आष्टा