For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विरोधकांची धार बोथट करण्यासाठी रणनीती

12:10 PM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
विरोधकांची धार बोथट करण्यासाठी रणनीती
Advertisement

कामकाज सल्लागार समिती बैठकीत विविध विषयांवर चर्चा : पुढील आठवड्यात विधानसभा अधिवेशनास होणार प्रारंभ

Advertisement

पणजी : पुढील आठवड्यापासून प्रारंभ होणाऱ्या विधानसभा हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कामकाज सल्लागार समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर गत काही महिन्यांपासून राज्यात घडलेल्या गंभीर विषयांवरून विरोधकांकडून धारदार विरोध होण्याची शक्यता गृहित धरून रणनीती ठरविण्यात आली. बैठकीला सभापती गणेश गावकर यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व इतर सदस्य उपस्थित होते. अधिवेशनात दि. 13 रोजी ‘वंदे मातरम्’वर चर्चा होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पुढे बोलताना त्यांनी बर्च दुर्घटनेत 25 जणांचा मृत्यू होणे ही गंभीर घटना आहे. त्यामुळे राज्यपालांनी अभिभाषणात याचा उल्लेख करायला हवा. बर्च दुर्घटनेसह कायदा सुव्यवस्था, युनिटी मॉल, जमीन विक्री यासारखे अन्य मुद्देही विरोधक संयुक्तपणे उपस्थित करणार आहेत. विरोधकांना प्रश्न मांडण्याची पुरेशी संधी मिळायला हवी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांकडून करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सरकारला घेरण्यासाठी विरोधकांचीही रणनीती

Advertisement

दरम्यान, विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनासाठी विरोधकांनी मंगळवारी बैठक घेत सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. ही रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत अधिवेशनात उठविण्याच्या ठळक मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस उपस्थितांमध्ये आमदार विजय सरदेसाई, अॅड. कार्लोस फरेरा, अॅल्टन डिकॉस्टा, वीरेश बोरकर आणि व्हेन्झी व्हियगस उपस्थित होते. अधिवेशनात सरकारला व्यवस्थित, तथ्यपूर्ण आणि संघटित पद्धतीने प्रश्न विचारले जातील. तसेच जनहिताच्या मुद्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल, असे ठरविण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी, राज्यातील भ्रष्टाचार, निक्रियता आणि जनतेच्या समस्या यांवर सरकारकडून झालेले दुर्लक्ष यासाठी सर्वांनी एकत्रित आवाज उठविणे आवश्यक असल्याचे ठरविण्यात आले. त्याचबरोबर सर्व गंभीर तसेच जनहिताच्या मुद्यांवर आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.