For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अजनबी कौन हो तुम...

06:33 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
अजनबी कौन हो तुम
Advertisement

ना तुम हमें जानो

Advertisement

ना हम तुम्हे जाने।

मगर लगता है कुछ ऐसा

Advertisement

मेरा हमसफर मिल गया।

जुन्या क्लासिक्समधलं एक लाजवाब गाणं! दिवसभराच्या श्रमाने, व्यापाने थकल्यानंतर अंग टाकताना हलके हलके स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणारं..या अशा गाण्यांना काळ नसतोच. असतात ते फक्त क्षण. सोनेरी, पिसासारखे, कानांना आणि मनाला पंख देणारे..कधीही ती कुपी उघडावी आणि सुरांचं अत्तर दरवळावं. मजरूह सुलतानपुरींचे अल्फाज, हेमंतकुमार यांचा स्वर आणि पडद्यावर सदाबहार देव आनंद...या चार ओळी आपल्याला केवढी गोष्ट सांगून जातात! अशी कोणीतरी अनोळखी दोघंजणं भेटतात. आणि पहिली ओळख गोडीची होऊन जाते. मग असं वाटतं की,

पहिलीच भेट झाली

पण ओढ ही युगांची

जादू अशी घडे ही

या दोन लोचनांची

पाडगावकर, अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा ही त्रयी हेही हे एक क्लासिक व्हर्जन आहे. म्हणजे नुसतीच भेट नाही घडत. बरंच काही होतं त्या एका भेटीत. त्या पहिल्या भेटीनंतर

डोळे मिटून घेता दिसतेस तू समोर

फुलवून पंख स्वप्नी अन् नाचतात मोर

झाली फुले सुगंधी माझ्याही भावनांची

म्हणजे त्या एकाच भेटीत अनोळखीची ओळख होऊन जाते आणि प्रेमही. म्हणजे एकमेकांना ओळखत नाही दोघांपैकी कुणालाच एकमेकांचीमाहिती नाही पण तारा जुळून येतात हे खरं.

अजनबी, अनोळखी, व्यक्ती आयुष्यात वेगवेगळ्या वळणावर भेटतात आपल्याला. आणि कधी त्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतात हे सांगता येत नाही. वर्षानुवर्षे एकत्र राहूनही हृदयातली जी तार झंकारून येत नाही ती नेमकी यांच्या पहिल्या भेटीत झंकारून येते. मोठं कोडं आहे हे. ‘जननान्तर सौहृदानि’ म्हणजे हेच ते. कुठल्या तरी जन्मीचे सुहृद या जन्मी भेटायला येतात आणि देणं संपलं की निघूनही जातात. म्हणून तर हा गाण्याचा विषय आहे. कधी कधी तर अशा अनोळखी व्यक्तींची ओढच लागते जिवाला.

ऐ अजनबी तू भी कभी आवाज दे कहीं से

मैं यहाँ टुकड़ों में जी रहा हूँ, तू कहीं टुकड़ों में

जी रही है

‘दिल से’ या फ्लॉप पिक्चरमधली सर्वच गाणी मात्र प्रचंड हिट झाली होती. त्यातलंच हे एक. तुकडे तुकडे झाल्यासारखं अर्धवट जगावं लागणारं अर्थहीन आयुष्य आणि तिच्या येण्याने ते जिगसॉ पझलसारखे तुकडे जुळून एक अर्थपूर्ण चित्र तयार होणार असतं बहुतेक. पण तो क्षण मात्र असा असतो, की विखुरलेलंच असतं भावविश्व. याचं बॅकग्राऊंड म्युझिकही अतिशय सुंदर आहे. एक आर्तता, आतून असणारी ओढ, आणि जिवाची या दोन टोकांच्यामध्ये चाललेली ओढाताण म्हणजे हे गाणं. अनोळखीचं ओळखीपण म्हणतात ते हेच. नटखट काजोलचं एक सुंदर गाणं म्हणजे,

अजनबी मुझको इतना बता

दिल मेरा क्यूं परेशान है

देख के तुझ को ऐसा लगे

जैसे बरसों की पहचान है

पुन्हा एकदा अजनबी.... तुला पाहिल्यावर माझं हृदय एवढं का बरं अस्वस्थ होतं? तू तर मला पहिल्यांदा भेटलायस तरीही मला असं का वाटतं की आपली ओळख आजची नाही तर फार पूर्वीची आहे! द आशाताई भोसले, जतीन ललित आणि उदित नारायण अशी धमाल मॉकटेल केमिस्ट्री आहे ही. चांगलं समोर रोज दिसणाऱ्या माणसांविषयी काही न वाटणाऱ्या नायिकेला एकाएकी एका अनोळखी माणसाविषयी असं का वाटतं बुवा? असा एक वात्रट प्रश्नही पडून जातो आपल्याला. पण तो बाजूला ठेवावा आणि अनोळखीच्या गाण्यांच्या प्रदेशात मुक्तपणे भटकावं. नवनवीन गाणी भेटत जातात आपल्याला.

अजनबी कौन हो तुम

जबसे तुम्हें देखा है

सारी दुनिया मेरी आँखो में

सिमट आयी है।

हे असंच एक क्लासिक. स्वर अर्थात लतादीदींचा. किती सुंदर आणि अर्थपूर्ण शब्द! आणि प्रत्येक शब्दावर दीदींच्या स्वरांतली ती कमानदार वलयं तर आहाहा...ऐन दुपारच्या वेळी गजबजलेल्या शहरातल्या शांत तृप्त घराच्या गॅलरीत विसावलेली गृहिणी अनोळखी व्यक्तींचं सहज निरीक्षण करताना दिसते तसं हे गाणं मनात हळूहळू उतरत जातं. तुला पाहिलं आणि आता माझ्या नजरेत सारं जग सामावलं आहे. म्हणजे तूच माझं जग झालास हे किती आल्लडपणे सांगते ती! नाजूक भावना तितक्याच नजाकतीने व्यक्त करावी तर अशी! विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातली मध्यमवर्गीय मुंबई अशा गाण्यातून चित्रासारखी स्पष्ट दिसते.

तशी अनोळखी लोकांशी कधी गाठ पडेल हे सांगता येत नाही. अगदी ‘भलत्या वेळी भलत्या मेळी, असता मन भलतीचकडे’ पडण्याबद्दल या गाठी प्रसिद्ध असतात. त्यासाठी आपणच कुठे जावं लागतं अशातलाही भाग नाही. अनोळखी कुणीसा चलत मुसाफिर आपल्या दारातच ठाकतो.

कोई मतवाला आया मेरे द्वारे

अँखियों से कर गया अज़ब इशारे

असंही होतं. आणि जाताना तो भलतीच गोष्ट मागतो आणि मग आपल्या नायिकेला हात जोडून

त्याला विनंती करायची वेळ येते की ही गोष्ट नको रे

सोना ले जा रे चाँदी ले जा रे

पैसा ले जा रे

हो? दिल कैसे दे दूँ मैं जोगी

के बड़ी बदनामी होगी..

अपरिचिताचं येणं जाणं हे असं असतं. खरंच सांगायचं तर अनोळखी जिवाविषयी आपलेपणा वाटायचा असेल तर मुळात पिंडातच विशाल प्रेमभाव असावा लागतो. आणि तो असेल तर मग जे जे पिंडी ते ब्रह्मांडी असल्याचा साक्षात्कार आपोआप होतो. अंत:करण शुद्ध असेल तर कोण्या एका अनोळखी व्यक्तीऐवजी पूर्ण जगाविषयीच आपुलकी निर्माण होते आणि ‘आवडी प्रेमभावो’ वोळतो. आणि मग भूतां परस्परे जडो मैत्र जिवांचे..अशी प्रार्थना सर्व अनोळखी माणसांसाठीही

होते.

- अॅड.अपर्णा परांजपे-प्रभु

Advertisement
Tags :

.