For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

होर्मुझ सामुद्रधुनी लवकरच पूर्ण ताब्यात

07:00 AM Aug 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
होर्मुझ सामुद्रधुनी लवकरच पूर्ण ताब्यात
Advertisement

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची पुन्हा घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था/वॉशिंग्टन डी.सी.

इराणनजीकच्या होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेचे लवकरच पूर्ण नियंत्रण प्रस्थापित होणार आहे, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केली आहे. इराण आता या सामुद्रधुनीचे संरक्षण करण्याच्या आणि तिला आपल्या अधिकारात ठेवण्याच्या परिस्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. इराणची सामरीक शक्ती अत्यंत क्षीण झाली असून त्याच्याकडे आता क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स यांची संख्या अत्यल्प झाली आहे. आता तो हल्ला करण्याच्या स्थितीत नाही, तो केवळ उसने अवसान आणून आपल्या शक्तीचे प्रदर्शन करण्यात गुंतला आहे, असा आरोप त्यांनी केला.

Advertisement

अमेरिका इराणला कोणत्याही परिस्थितीत आणुबाँब किंवा अण्विक शस्त्रे निर्माण करण्याची अनुमती देणार नाही. इराणचा अणुबाँब हा जगासाठी अत्यंत धोकादायक ठरु शकतो. सध्या अमेरिकेने इराणला अणुबाँब निर्माण करण्यापासून रोखले आहे. त्याची अणुबाँब निर्माण करण्याची क्षमता आमच्या सततच्या हल्ल्यांमुळे संपली आहे, किंवा अत्यंत क्षीण झाली आहे. तथापि, भविष्यकाळात पुन्हा त्या देशाने अणुबाँब निर्माण करण्याचा प्रयत्न केलाच, तर अमेरिका त्याला पुन्हा धडा शिकविणार आहे. इराणने आपला अणुबाँब बनविण्याचा कार्यक्रम पूर्णपणे सोडून द्यावा. यातच त्या देशाचे हित आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

अन्य देशांनाही इशारा

जे देश इराणला सैनिकी आणि शस्त्रांचे साहाय्य करीत आहेत, त्यांनाही डोनाल्ड ट्रंप यांनी इशारा दिला आहे. इराणवर अमेरिकेने आर्थिक निर्बंध् लागू केले आहेत. तरीही काही देश छुप्या मार्गाने इराणकडून तेलाची खरेदी करीत आहेत. तसेच त्या देशाला अर्थसाहाय्य आणि शस्त्रपुरवठा करीत आहेत. त्यांनी हे थांबविले नाही, तर त्यांना अमेरिकेचा राग ओढवून घ्यावा लागणार आहे. काही देशांच्या कंपन्या इराणच्या उपयोगी पडत आहेत. या कंपन्यांवरही अमेरिका आर्थिक निर्बंध लादू शकते. जे देश इराणला सहकार्य करीत आहेत, त्यांच्यावरही निर्बंध आणले जाऊ शकतात, हे त्या देशांनी लक्षात ठेवले पाहिजे, असाही इशारा ट्रंप यांनी दिला.

नवे आर्थिक निर्बंध

अमेरिकेने गुरुवारपासून इराणवर नवे आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध पूर्वीच्या निर्बंधांपेक्षाही कठोर आहेत. इराणच्या तेलविक्रीवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. इराणच्या अनेक बँका आणि कंपन्यांवरही बंदी आणण्यात आली आहे. इराणची सागरी वाहतूक व्यवस्था आणि देशांतर्गत वाहतूक व्यवस्थाही अमेरिकेने लक्ष्य केली आहे. इराणच्या व्यापारी नौका कंपन्यांना व्यवहार करण्यापासून रोखण्यात आले आहे. भविष्यकाळात आणखी कठोर निर्बंध येतील.

चीनची अमेरिकेवर टीका

इराणवर आर्थिक निर्बंध लादल्याने कोणतीही समस्या सुटणार नाही. इराण हा कमजोर देश नाही. अमेरिकेने इराणशी चर्चा करुन प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा. चर्चेतून मार्ग निघू शकेल, अशी परिस्थिती आहे. अमेरिका आणि इराण यांनी अत्यंत जबाबदारीने पावले उचलावीत. कारण त्यांच्यातील संघर्षाचे परिणाम जगावर होत आहेत. परिस्थिती हाताळण्यात दोन्ही देशांनी चूक केल्यास संघर्षं अधिक चिघळू शकता, असा इशारा चीनने अमेरिका आणि इराणला दिला आहे.

Advertisement
Tags :

.