'डंपिंग ग्राऊंड’ मध्ये साकारली ‘स्ट्रेट साईड गार्डन’
कोल्हापूर / राधिका पाटील :
कळंबा येथील आयटीआय कॉर्नर ते हनुमाननगरमार्गे पाचगावकडे जाताना सुरुवातीलाच पूर्वी या रस्त्याच्या बाजूला कचरा दिसायचा. प्लॅस्टिकच्या बाटल्या, शिल्लक अन्नाच्या पिशव्या, दारूच्या बाटल्यांसह अन्य ओला सुका, कचरा पहायला मिळत होता. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला होता. ही कुत्री रस्त्याकडेला टाकलेला कचरा विस्कटत असल्यामुळे कचरा रस्त्यावर येत होता. परिणामी कुत्र्यांच्या दहशतीसह कचऱ्याच्या दुर्गंधीचा नागरीकांना खूप त्रास होत होता. या सर्व समस्यांवर उपाय शोधला तो हनुमाननगरातील समाजसेवेची आवड असणारे आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या तानाजी जाधव यांनी. त्यांच्या डोक्यात ‘स्ट्रेट साईड गार्डन’ ची संकल्पना आली. आणि त्यातून त्यांनी सुंदर बगीचाही साकारला. भविष्यात या गार्डनमध्ये अनेक सोयी, सुविधा उपलब्ध करण्याचा त्यांचा मानस आहे.
2024 पूर्वी आयटीआय कॉर्नर परिसरात कचऱ्याशिवाय काहीच नव्हते. या रस्त्याची केवळ कचराकुंडी झाली होती. पण आता त्याचे रूपच पालटून गेले आहे. या ठिकाणी निर्माण केलेल्या बगीच्यामध्ये झाडे, झाडाभोवती केलेली हिरवळ, लोकांना बसण्यासाठी बेंच, विद्युत रोषणाई, दिवे, वॉशरुम अशी बरीचशी कामे पूर्ण झाली आहेत. काही कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. केवळ बगीचाच नव्हे तर प्रभागाची स्वच्छता राखणे, वेळोवेळी औषध फवारणी करणे, गटारी स्वच्छ करणे, गटारी शेजारील गवत काढणे, फांद्या, गवत कचरा काढल्यानंतर तो ट्रॅक्टरमधून नेण्याची व्यवस्था करणे, तसेच कोणाची काही अडचण असेल तर त्यांना मदत करणे अशीही कामे जाधव स्वखुशीने करतात.
फक्त हनुमाननगर प्रभागच नाही तर त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन लोकांनी त्यांना बोलावून शेंडापार्कची स्वच्छता केली. तसेच रेणुका मंदिर परिसर, आयसोलेशन हॉस्पिटल परिसर कोल्हापूर शहरातील इतर ठिकाणीही त्यांनी स्वच्छता मोहिम राबवून कोल्हापूर शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. मनात जिद्द आणि लोकसहभाग असेल तर काहीही अशक्य नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे. प्रशासनाने देखील त्यांच्या कार्याची दखल घेऊन समाजकार्याला प्रशासकीय जोड द्यावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून होत आहे.
- अशी साकारली ‘स्ट्रेट साईड गार्डन’
‘स्ट्रेट साईड गार्डन’बाबत माहिती सांगताना तानाजी जाधव म्हणाले, डंपिंग ग्राऊंड बनलेला आयटीआय कॉर्नर हा पाचगाव रोड व हनुमाननगरचे प्रवेशद्वार असून ते स्वच्छ असावे अशी माझी भूमिका आहे. त्यामधून ही कल्पना सुचली व काही नागरिकांबरोबर मी चर्चा केली. या चर्चेतून या ठिकाणी गार्डन करून बसायला बेंच, लाईट, झाडे, आदी सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील ? याबाबत एक प्राथमिक आराखडा निश्चित केला. पण कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करताना अडचणी या येतातच. त्यामुळे काही विघ्नसंतोषी लोकांनी माझ्या समाजसेवेच्या कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण काही चांगले लोक माझ्यासोबत असल्यामुळे त्यांनी माझ्या संकल्पनेला आकार देण्यासाठी मदत करून आर्थिक हातभार लावला. त्यामुळेच आज सुंदर बगीचा साकारला आहे. अजूनही या बागेमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी खूप काही सोयी, सुविधा करण्याचा माझा विचार आहे. त्यासाठी लोकांनीही पुढे येण्याची गरज आहे.