For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यातून थेट यशाच्या शिखरावर

06:55 AM Mar 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यातून थेट यशाच्या शिखरावर
Advertisement

कर्नाटकला नमवून जम्मू काश्मीर रणजी चॅम्पियन : रणजीच्या इतिहासात प्रथमच नवा संघ जेता

Advertisement

वृत्तसंस्था/ हुबळी

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये आज एका नव्या अध्यायाची सुवर्ण अक्षरांत नोंद झाली. रणजी ट्रॉफीच्या रोमहर्षक अंतिम सामन्यात जम्मू आणि काश्मीरने बलाढ्या कर्नाटक संघावर मात करत प्रथमच रणजी चषकावर नाव कोरले. विशेष म्हणजे, अंतिम फेरीत पोहोचण्याची ही जम्मू-काश्मीरची पहिलीच वेळ होती आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी जेतेपदाला गवसणी घातली.

Advertisement

हुबळी येथे जम्मू-काश्मीरचा आठ वेळच्या विजेत्या कर्नाटकविरुद्ध अंतिम सामना झाला, जो अनिर्णित राहिला. या अंतिम सामन्यात जम्मू-काश्मीरने शेवटच्या दिवशी दुसरा डाव घोषित केला आणि विजेतेपदाचे सेलिब्रेशन केले. या सामन्यात जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात तब्बल 291 धावांची आघाडी मिळवली होती. याच आघाडीमुळे सामना अनिर्णित राहिल्याने जम्मू-काश्मीरला विजयी घोषित करण्यात आले. विशेष म्हणजे, जम्मू संघाने प्रथमच रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. संघ 1959 पासून या स्पर्धेत भाग घेत आहे आणि 67 वर्षांनंतर पहिले विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला आहे. या दणदणीत विजयानंतर जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी संघाला 2 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

रणजी इतिहासात प्रथमच जम्मू संघ चॅम्पियन

प्रारंभी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात तब्बल 584 धावांचा डोंगर उभा केला. दुसऱ्या विकेटसाठी शुभम पुंडीरने शानदार शतकी खेळी साकारताना 121 धावा फटकावल्या. यावीर हसनने 13 चौकारासह 88 धावांची खेळी साकारली. याशिवाय, अब्दुल समदने 61 धावांचे मोलाचे योगदान दिले. कर्णधार पारस डोगराने 70 धावा करत नेतृत्वाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली, तर साहिल लोत्रानेही 72 धावांची उपयुक्त खेळी केली. कर्नाटककडून प्रसिद्ध कृष्णाने 5 विकेट घेत प्रभावी गोलंदाजी केली.

पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या कर्नाटकची सुरुवात खराब झाली. जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज औकिब नबीने अचूक मारा करत कर्नाटकच्या स्टार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. दिग्गज केएल राहुल (13) स्वस्तात बाद झाला. यानंतर करुण नायर आणि स्मरण आर यांनाही खातेही उघडता आले नाही. औकिबच्या या भेदक गोलंदाजीमुळे कर्नाटकवर सुरुवातीपासूनच दबाव निर्माण झाला. त्यातच सुनील कुमारने देवदत्त पडिक्कलचा बळी घेत कर्नाटकच्या अडचणीत भर टाकली. एकीकडे विकेट्स पडत असताना कर्णधार मयंक अग्रवालने दुसरा टोक सांभाळत शानदार शतक झळकावले आणि डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र औकिब नबीने त्यालाही 160 धावांवर बाद करत जम्मू संघाला मोठे यश मिळवून दिले. मयंक बाद झाल्यानंतर कर्नाटकचा पहिला डाव 293 धावांवर आटोपला आणि जम्मू-काश्मीर संघाला पहिल्या डावात 291 धावांची भक्कम मिळाली. यानंतर पहिल्या डावात आघाडी मिळूनही जम्मू-काश्मीरने फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला.

दुसऱ्या डावात जम्मू आणि काश्मीरकडून कामरान इक्बाल आणि साहिल लोत्रा यांनी शतके झळकावली. या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर जम्मू संघाने दुसऱ्या डावात 4 बाद 342 धावा केल्या. कामरानने नाबाद 160 तर साहिलने नाबाद 101 धावांचे योगदान दिले. पाचव्या दिवशी दुपारी कर्णधार पारस डोग्राने आपला डाव घोषित केला आणि नियमानुसार पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर जम्मू संघाला विजयी घोषित करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

जम्मू-काश्मीर पहिला डाव 173.1 षटकांत सर्वबाद 584 (यावीर हसन 88, शुभम पुंडीर 121, पारस डोगरा 70, साहिल लोत्रा 72, प्रसिध्द कृष्णा 5 बळी)

कर्नाटक पहिला डाव 93.3 षटकांत सर्वबाद 293 (मयंक अगरवाल 160, कृतिक कृष्णा 36, श्रेयस गोपाल 27, आकिब नाबी 5 बळी, सुनील कुमार आणि युद्धवीर सिंग प्रत्येकी 2 बळी)

जम्मू-काश्मीर दुसरा डाव 113 षटकांत 4 बाद 342 (कमरान इक्बाल 160, साहिल लोत्रा 101, प्रसिध कृष्णा 2 बळी).

Advertisement
Tags :

.