For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रालोआचा झंझावात

06:45 AM Nov 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
रालोआचा झंझावात
Advertisement

बिहारच्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी स्वत:चा 2010 च्या निवडणुकीतील 206 जागांचा विक्रमही यावेळी मोडीत काढणार अशी शक्यता आहे. विरोधकांचा अक्षरश: धुव्वा उडाला आहे. काँग्रेस तर या राज्यात 4 ते 5 जागांपुरतीच उरणार अशी स्थिती आहे. एकंदर, या निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उत्तरदायित्व वाढविले आहे, तर विरोधकांना जबर तडाखा देऊन त्यांना ‘शहाणे’ करण्याचा प्रयत्नही केला आहे, असे दिसून येते. राष्ट्रीय लोकशाही आघाडी 206 जागांच्या पार जाण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांची  राजकारणातील अत्यंत अनुभवी, कष्टातून उच्चपदी पोहचलेली आणि जनतेची नस माहीत असणारी जोडगोळी होती. तर दुसऱ्या बाजूला तेजस्वी यादव आणि राहुल गांधी अशी त्यामानाने तरुण आणि ‘घराणेदार’ जोडी होती. बिहारच्या जनतेने घराणेशाहीपेक्षा अनुभव आणि कष्ट यांच्यावरच पूर्ण विश्वास टाकल्याचे दिसून येते. निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध झालेले मतदानपूर्व सर्वेक्षणांचे निष्कर्ष आणि नंतर मतदानोत्तर सर्वेक्षणांचे निष्कर्ष यांच्यावरुन राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय होणार ही शक्यता होतीच. पण मतदार विरोधकांची इतकी दयनीय अवस्था करेल, असे वाटत नव्हते. त्यामुळे या निवडणुकीने विरोधकांना मोठा धडा शिकविला आहे. विरोधकांनी जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत न करता ‘मतचोरी’, निवडणूक आयोग आदी निरर्थक आणि पोकळ विषय हाती घेतले. राहुल गांधी यांनी तर मतचोरीच्या मुद्द्यावर 16 दिवसांची राज्यव्यापी यात्रा काढली. पण मतदारांनी हा मुद्दा अक्षरश: गाडून टाकला. पुढच्या काळात या वांझोट्या मुद्द्यावर किती भर द्यायचा याचे तारतम्य काँग्रेसला बाळगावे लागणार आहे. खरे तर ‘मतचोरी’ असा काही प्रकार अस्तित्वातच नाही. मतदारसूची बनविताना ती बनविणाऱ्यांकडून काही चुका होतात. मतदाराचे नाव चुकीचे असणे, वय चुकीचे नमूद करणे, मृत मतदारांची नावे वेळीच न वगळणे, निवासाचे स्थान मतदाराने बदलल्यामुळे त्याची दोन किंवा अधिक मतदान केंद्रांवर नावे असणे, इत्यादी बाबी या खरेतर ‘क्लेरिकल मिस्टेक्स’ असतात. त्या दूर करणे आवश्यक असते. पण हे सत्ताधारी आणि निवडणूक आयोग यांनी केलेले कारस्थान आहे, असा रंग या प्रकारांना देणे आणि पराचा कावळा करुन व्यवस्थेवरच लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हा अतिरेक म्हणावा लागेल. तो करण्याचा विरोधकांचा, विशेषत: काँग्रेसचा प्रयत्न त्यांच्याच अंगलट आला आहे. भारतीय मतदार आता सूज्ञ झाला आहे. राजकीय पक्षांच्या भुलथापांना बळी पडण्याइतका तो अजाण राहिलेला नाही. कामगिरी करणारे नेते आणि नुसत्याच घोषणा करणारे आणि देशात अस्थिरता माजवू पाहणारे नेते यांच्यातील फरक त्याला कळतो. पण त्याला जे कळते, ते त्याचे नेतृत्व करण्याचे स्वप्नरंजन करणाऱ्या काही नेत्यांना कळत नाही, हे भारतीय लोकशाहीचे दुर्दैव आहे. भारतीय लोकशाहीला खरा धोका कोणापासून असेल, तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून नाही. तर अशा नेत्यांपासून आहे. इतकेच नव्हे, तर अशा नेत्यांना स्वत:च्या डोक्यावर चढवून घेणारे आणि जनतेच्या डोक्यावर चढवू इच्छिणारे काही ‘मीडिया पर्सन्स’ पत्रकार आणि तथाकथित विचारवंत यांच्यापासूनही लोकशाहीला धोका आहे. जनतेने असे नेते आणि त्यांची भलावण करणारे, अशा दोघांनाही ही सणसणीत चपराक दिली आहे. निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काही लोककल्याणात्मक घोषणा करुन त्या लागूही केल्या. त्यांच्यामुळे हा विजय झाला, असा याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न आता केला जाईल. तथापि, या विक्रमी विजयाचे हे एकमेव कारण नाहीच. गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये मोठी विकासकामे झाली. संघटित गुन्हेगारीला चाप बसला. कृषी क्षेत्रात मोठी प्रगती झाली. अनेक नवे उद्योगही बिहारमध्ये आले. आणखी येत आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात तर क्रांती झाली असे म्हणता येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख धोरणाचीची मोठी जोड मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या प्रयत्नांना मिळाली आहे. बिहारमध्ये खऱ्या अर्थाने ‘डबल इंजिन’ सरकारचा लाभ दृष्य स्वरुपात तेथील जनतेला झाल्याशिवाय इतका मोठा विजय मिळणे शक्य नव्हते. बिहारची ‘जंगलराज’ किंवा ‘गुंडाराज’ ही प्रतिमा पुसली गेली आहे. वास्तविक, 20 वर्षांची प्रस्थापित विरोधी भावना मोडून काढून विक्रमी विजय मिळविणे हे तसे सोपे नसते. पण सत्ताधाऱ्यांची जनताभिमुख धोरणे आणि विरोधी पक्षांचा नाकर्तेपणा यामुळे हा प्रचंड विजय साध्य झाला आहे. आणखी एक मुद्दा ‘हिंदुत्वा’चाही आहे. तो स्पष्टपणे दिसत असतानाही झाकून ठेवायचा, ही खास धर्मनिरपेक्ष फॅशन आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे, की आज भारतात एक हिंदू मतपेढी निश्चितच निर्माण झाली आहे. जातींच्या भिंती ओलांडून एका हिंदुत्ववादी मानल्या गेलेल्या पक्षाला मतदान करणाऱ्यांची संख्या बऱ्याच प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे हिंदूंमध्ये जातींच्या आधारावर फूट पाडायची. हिंदूंमधील काही जातींना आपल्याकडे घ्यायचे आणि अल्पसंख्याकांच्या, विशेषत: मुस्लीमांच्या एकगठ्ठा मतांची जोड देऊन यशाचे सूत्र बनवायचे, हे पुरोगामी प्रयोग आता फसत आहेत. हिंदूही एकगठ्ठा मतदान करु शकतात. त्यांनी तसे केले तर अल्पसंख्याकांची मतपेढी फारशी उपयोगी ठरत नाही. हे स्पष्टपणे दिसून येते. या वस्तुस्थितीची जाणीव स्वत:ला ‘धर्मनिरेपक्ष’ म्हणवून घेणाऱ्या, पण प्रत्यक्षात हिंदू धर्माचा अवमान करुन अल्पसंख्याकांची खुषमस्करी करणाऱ्या राजकीय पक्षांना करुन घ्यावी लागणार आहे. असे अनेक धडे या निवडणुकीने विरोधी पक्षांना शिकविले आहेत. ‘आता तरी जागे व्हा’ हा या निवडणुकीचा संदेश विरोधी पक्षांसाठी आहे. सत्ताधारी आघाडीसाठीही महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यावरील उत्तरदायित्व वाढले आहे. त्यांना विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करताना विकासाची फळे सर्वसामान्यांपर्यंत नेण्याची प्रक्रियाही नेटाने सुरु ठेवायची आहे. तसे होईल, अशी अपेक्षा.

Advertisement

Advertisement
Tags :

.