For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तर प्रदेश-बिहारमध्ये वादळ-पावसाचे 48 बळी

06:52 AM May 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
उत्तर प्रदेश बिहारमध्ये वादळ पावसाचे 48 बळी
Advertisement

उत्तर भारतातील राज्यांमध्ये वातावरणात मोठा बदल : नैसर्गिक आपत्तींमुळे जीवितहानी

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ, पाटणा

उत्तर प्रदेश, बिहार आणि पंजाबसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हवामानामध्ये अचानक मोठा बदल झाला आहे. जोरदार वादळ, मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. विविध राज्यांतील वृत्तानुसार, या खराब हवामानामुळे उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांमध्येही किमान 48 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. अन्य राज्यांमध्येही जीवितहानी झाली असली तरी तेथील आकडा मर्यादित असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिह्यात मुसळधार पाऊस आणि जोरदार प्रवाहामुळे 10 वाहने वाहून गेली. प्रशासन आणि मदत पथके घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी बचावकार्य सुरू केले आहे. अनेक भागांमध्ये झाडे आणि विजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाला. बिहारमधील खराब हवामानाचा परिणाम हवाई सेवेवरही झाला. पाटणा विमानतळावर कमी दृश्यमानता आणि जोरदार वाऱ्यांमुळे चार विमाने इतर शहरांमध्ये वळवण्यात आली, तर 18 विमानांना विलंब झाला. वातावरणातील दमटपणामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. दरम्यान, पंजाबच्या अनेक जिह्यांमध्ये गारपीट आणि जोरदार वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी अनेक भागांमध्ये सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

उत्तर प्रदेशात मेघगर्जना आणि पावसामुळे दोन दिवसांपासून हवामान बदलले आहे. राज्यात वादळ आणि वीज कोसळल्याने झालेल्या अपघातांमध्ये 31 जणांचा बळी गेला आहे. सर्वाधिक 15 मृत्यू बुंदेलखंडमध्ये झाले आहेत. यापैकी सहा हमीरपूरमध्ये, तीन बांदामध्ये, तर महोबा, ओराई आणि जालौनमध्ये प्रत्येकी दोन जण ठार झाले. याव्यतिरिक्त, कौशांबीमध्ये चार, सहारनपूर आणि देवरियामध्ये प्रत्येकी दोन, तर प्रतापगड, आंबेडकरनगर, बलिया, महाराजगंज, मथुरा, उन्नाव, फतेहपूर आणि रामपूर येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळपासूनच राज्यभरातील बहुतेक शहरांमध्ये ढगाळ वातावरण होते. दुपारी 3 वाजता लखीमपूर-खेरी, बहराइच, सहारनपूर आणि मेरठ येथे मेघगर्जनेसह पाऊस झाला. काळ्या ढगांनी आकाश व्यापल्यामुळे अंधार पसरला होता. दरम्यान, हवामान विभागाने पश्चिम उत्तर प्रदेशात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाऊस आणि वादळामुळे झालेल्या नुकसानीची दखल घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांना जागरुक राहण्याचे आदेश दिले आहेत.

बिहारमध्ये दैनंदिन जीवनमानावर परिणाम

बिहारमध्ये गेल्या 24 तासात वादळ, पाऊस आणि वीज कोसळल्याने 17 जणांचा मृत्यू झाला आहे. पाटणामध्ये पावसामुळे चार विमानांचे मार्ग बदलण्यात आले, तर 18 विमानांना विलंब झाल्याने 500 हून अधिक प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. गेल्या दोन दिवसांपासून येथील वातावरण बदलले असून मेघगर्जना, वीज कोसळणे आणि जोरदार अवकाळी पाऊस असा तिहेरी दणका सुरू आहे.

मध्य प्रदेशातील 9 जिह्यांमध्ये सतर्कता

मध्य प्रदेशातही शुक्रवारपासून अनेक जिह्यांमध्ये पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने ग्वाल्हेर, भिंड, दातिया, निवारी, टिकमगड, छतरपूर, पन्ना, नीमच आणि मंदसौरमध्ये गारपीट आणि पावसाचा इशारा दिला आहे. पावसामुळे राजधानी भोपाळसह अनेक शहरांमध्ये उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पंजाब-चंदीगडमध्ये गारपीट

पंजाबमधील पठाणकोटमध्ये शनिवारी सकाळी गारपिटीचे वादळ झाले, तर मोहालीमध्ये मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाने चंदीगड, मोहाली आणि पंचकुलासह पंजाबच्या 13 जिह्यांमध्ये सोसाट्याचा वारा आणि पावसाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, छत्तीसगडमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवसांत राज्याच्या अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

झारखंडमध्ये चार जणांचा मृत्यू

झारखंडमध्ये वादळ, पाऊस आणि वीज कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. रांची, बोकारो, गरवा आणि धनबाद हे प्रभावित भागांपैकी आहेत. राज्यातील तापमान गेल्या 24 तासांत 8.6 अंश सेल्सिअसने घटले आहे. उत्तराखंडच्या पर्वतीय प्रदेशात खराब हवामान कायम आहे. मुक्तेश्वरमध्ये सर्वाधिक 28.5 मिमी पावसाची नोंद झाली. राज्यात पुढील दोन दिवस पाऊस, गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. यादरम्यान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने घट होऊ शकते, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.