‘वंदे भारत’ला घटप्रभा थांबा द्या
इराण्णा कडाडींची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : पुणे-बेळगाव-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसला उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. जिल्ह्यातील इतर नागरिकांनाही या एक्स्प्रेसचा लाभ घेता यावा, यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस घटप्रभा रेल्वेस्थानकावर काही काळासाठी थांबवावी, अशी मागणी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत कडाडी यांनी रेल्वेमंत्र्यांची दिल्ली येथे भेट घेतली. मागील दोन महिन्यात वंदे भारत एक्स्प्रेसला चांगला प्रतिसाद मिळत असून, हुबळी तसेच बेळगावच्या नागरिकांना वेगवान प्रवास करता येत असल्याबद्दल रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले. सध्या वंदे भारत एक्स्प्रेस धारवाड, बेळगाव, मिरज, सांगली या महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर थांबते. याबरोबरच बेळगाव जिल्ह्यातील इतर प्रवाशांनाही वंदे भारतचा प्रवास करता यावा, यासाठी घटप्रभा रेल्वेस्थानकावर थांबा देण्याची मागणी कडाडी यांच्याकडून केली.