वडगाव नॉनस्टॉप बससेवा बंद करा
नागरिक-विद्यार्थ्यांची आंदोलनाद्वारे मागणी
बेळगाव : विष्णू गल्ली, वडगाव येथे सोडण्यात येणारी नॉनस्टॉप बससेवा बंद करा, या मागणीसाठी मंगळवारी नागरिक आणि विद्यार्थ्यांनी बस थांबवून आंदोलन छेडले. वडगावसाठी परिवहनने दोन नॉनस्टॉप बसची व्यवस्था केली आहे. मात्र या बससेवेमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे ही बससेवा बंद करून पूर्ववत बससेवा सुरू करावी, अशी मागणी केली आहे. थेट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने शहरातील काही भागात नॉनस्टॉप बससेवा सुरू केली आहे. मात्र या बससेवेमुळे सुविधेपेक्षा असुविधाच अधिक निर्माण होऊ लागली आहे.
तातडीने ही बससेवा बंद करावी. यासाठी वडगाव येथील नागरिक व विद्यार्थी रस्त्यावर उतरले. दरम्यान, डीटीओ के. के. लमानी यांच्याशी मोबाईलद्वारे संवाद झाल्यानंतर त्यांनी पूर्ववत बससेवेचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शक्ती योजनेमुळे बससेवेचे तीनतेरा वाजले आहेत. विविध मार्गावर अनियमित आणि अपुऱ्या बससेवेमुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे हाल होऊ लागले आहेत. अतिरिक्त प्रवाशांमुळे बसफेऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे चेंगराचेंगरी करत धोकादायक प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बससेवेबाबत दिवसेंदिवस तक्रारी वाढताना दिसत आहेत. प्रशासन, परिवहन मंडळ आणि लोकप्रतिनिधी याची दखल घेणार का? हेच आता पहावे लागणार आहे.