शाळा,कॉलेज परिसरातील तंबाखूजन्य विक्री बंद करा
सांगली :
शाळा, कॉलेजच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी आहे. महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतींनी तपासणीसाठी आवश्यक कार्यवाही करावी. कोणत्याही स्थितीत ते बंद झाले पाहिजे अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिल्या.
अंमली पदार्थ विरोधी टास्कफोर्सने प्रतिबंधक उपायांची कडक अंमलबजावणी करावी. कायद्याचा धाक निर्माण करावा व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशाही सुचना दिल्या. अंमली पदार्थ टास्क फोर्सची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हाधिकारी अशोक काकडे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम सांगणारी लघुचित्रफीत शाळा महाविद्यालयात दाखवून जागृती करावी, शाळा कॉलेजपासून शंभर मीटर परिसरातील सर्व तंबाखूजन्य विक्री बंद करा, असे सांगितले.
जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील जे उद्योग बंद आहेत, ज्या उद्योगासाठी परवाना घेतला आहे तो उद्योगच तेथे सुरू आहे का याची तपासणी करून कार्यवाही करावी. काही अडचण येत असेल तर संबंधित विभागास कायद्यात सुधारणा करण्याबाबत कळवावे.
सांगली, मिरज शहरातील सीसीटीव्डे कॅमेरे सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी. त्याच्या दुरूस्तीसाठी व अनुषंगिक कामाकासाठी अंदाजपत्रक तयार करावे जेणेकरून त्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देण्याची ग्वाही दिली. आठवड्याभरातील घटना व त्याअनुषंगाने कारवाईचा आढावा घेतला. पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी याबाबत माहिती दिली.