डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फलक फाडल्याच्या निषेधार्थ सडोली दुमाला येथे रास्ता रोको
अज्ञातांच्या निंदनीय कृत्याचा निषेध . पोलिस प्रशासनाच्या मध्यस्थीने वेळेत तोडगा काढून स्थगिती
कसबा बीड प्रतिनिधी
सडोली दुमाला (ता.करवीर) येथे फाट्यावर उभारलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा डिजिटल फलक अज्ञात व्यक्तीने फाडल्याचे आज गुरुवारी निदर्शनास येताच चार वाजता दलित समाजाच्या वतीने रास्ता रोको करत या खोडसाळ घटनेचा जाहीर निषेध केला. यावेळी दलित बांधवानी टायर पेटवून निषेधाच्या घोषणा दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करत हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.
काल बुधवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस देशभरासह जगभरातून अभिवादन करण्यात आले. अशा प्रसंगी सडोली दुमाला गावात असा प्रकार घडल्याचे समजताच येथील आठवले गटाचे अतुल कांबळे, सिताराम कांबळे, आनंद कांबळे, बळवंत मल्लू कांबळे, अनिल लोखंडे, सुनील तोरस्कर आदीसह दलित समाजाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर दगड लावून रास्ता रोको केला. टायर पेटवून निषेधाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या यां घटनेमुळे रस्त्यावर वाहनधारकांच्या रांगा लागल्या.
दरम्यान घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक अरविंद काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, रणजित देसाई यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. अज्ञात समाजकंटकाचा शोध घेऊन कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे, निवास सडोलीकर, वंचितचे रतन कांबळे, कुंडलिक पाटील, संदिप कांबळे आरळे, बाबासो मडके, यांच्यासह दलित समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी फाडलेले डिजिटल उतरवून त्या ठिकाणी नवीन डिजिटल फलक उभारण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.
अज्ञात समाजकंटकाकडून झालेल्या कृत्याचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलीस प्रशासनाकडून सांगितले. तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नवीन डिजिटल फलक आणून फलकाचे अनावरण करण्यात आले.त्यामुळे जातीभेद करून डिजिटल फाडून अनुचित प्रकार करण्याच्या प्रवृत्तीला दलित बांधव व पोलीस प्रशासनाने शांततेने उत्तर दिले.