For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिडकलचे पाणी वळविणारा प्रकल्प तात्काळ थांबवा

10:43 AM Feb 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
हिडकलचे पाणी वळविणारा प्रकल्प तात्काळ थांबवा
Advertisement

‘आमचे पाणी, आमचा हक्क’ समितीची मागणी : अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

Advertisement

बेळगाव : हिडकल जलाशयाचे पाणी हुबळी-धारवाड औद्योगिक वसाहतीकडे वळविण्याचा प्रकल्प तात्काळ बंद करावा, अन्यथा आगामी काळात याविरोधात तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा ‘आमचे पाणी, आमचा हक्क’ संघर्ष समिती, अखिल कर्नाटक रयत संघ यासह इतर संघटनांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन सोमवारी प्रादेशिक आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. लघुपाटबंधारे खात्यामार्फत घटप्रभा नदीवर असलेल्या हिडकल जलाशयाचे पाणी धारवाड आणि हुबळी औद्योगिक वसाहतीला देण्यासाठी प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पामुळे बेळगाव, संकेश्वर आणि हुक्केरी तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. अलीकडे बेळगावसह हुक्केरी, संकेश्वर शहरांच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याची मागणीही वाढली आहे. असे असताना हिडकल जलाशयाचे पाणी धारवाड औद्योगिक वसाहतीकडे वळविले जात आहे. या प्रकल्पाला शेतकरी आणि विविध संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. शिवाय हा प्रकल्प तातडीने थांबवावा, अशी मागणीही केली आहे.

हिडकल जलाशयातून बेळगाव, संकेश्वर आणि हुक्केरी शहराला पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, उन्हाळी हंगामात या शहरांनाही पाण्याची भीषण टंचाई निर्माण होते. भविष्यात नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मारक असलेला हा प्रकल्प तातडीने बंद करावा, अशी मागणीही लावून धरण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी 1313 कोटी रुपयांचा निधी खर्ची घातला जाणार आहे. शिवाय गोकाक आणि बैलहोंगल तालुक्यातील 80 किलोमीटर जलवाहिनी घालण्यासाठी शेतीत खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. बेळगाव आणि बैलहोंगल तालुक्यांचे या प्रकल्पामुळे नुकसान होणार आहे. यासाठी हा प्रकल्प बंद करावा अन्यथा याविरोधात तीव्र लढा दिला जाईल, असेही विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिल्यानंतर त्यांनी या प्रकल्पाला लवकरच नोटीस पाठवून याबाबतचे उत्तर घेण्यात येणार आहे, असे आश्वासन दिले. यावेळी शेतकरी संघटनेचे सिद्धगौडा मोदगी, म. ए. समितीचे रमाकांत कोंडुसकर, सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद, दलित नेते मल्लेश चौगुले, रणजित चव्हाण-पाटील यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.