नाल्यावरील अतिक्रमण थांबवा; अन्यथा शेतीला धोका
बेनकनहळ्ळी केंबाळी नाल्याचे अस्तित्व धोक्यात, संबंधित खात्याचे दुर्लक्ष : शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता
वार्ताहर/किणये
ग्रामीण भागातील अनेक गावांच्या लगत नाले आहेत. हे नाले नद्यांना जाऊन मिळालेले आहेत. या नाल्यांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा झाल्यास त्याचा उपयोग शेतीसह जनावरांना होतो. मात्र सद्यस्थितीत बहुतांश भागातील नाले हे दुर्लक्षित झालेले आहेत. नाल्यांमध्ये केरकचरा टाकण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढले आहे. तालुक्यातील पश्चिम भागातील बेनकनहळ्ळी येथील केंबाळी नाला हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. मात्र सध्या या नाल्याचे अस्तित्व धोक्यात आले असल्याची चर्चा या भागात सुरू आहे.
केंबाळी नाल्यात झाडे-झुडपे वाढलेली आहेत. तसेच ठिकठिकाणी नाल्यात कचरा टाकण्यात येत आहे. सांडपाणी सोडण्यात आलेले आहे व काही ठिकाणी अतिक्रमण होत आहे. नाल्यावरील अतिक्रमण वाढल्यास बेनकनहळ्ळी मुख्य रस्त्यावरील पुलाच्या बाजूने पाणी पावसाळ्यात शिवारात शिरण्याचा धोका आहे. त्यामुळे या नाल्याच्या नियोजनासाठी धोरणात्मक पावले उचलण्याची गरज आहे, तसेच नाल्यावरील अतिक्रमणे थांबवावी, अन्यथा शेतीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
केंबाळी नाल्याला तीन नाल्यांचे पाणी
हंगरगा डोंगर भागातून एक, मंडोळी बसवाण्णा मंदिर परिसरातून दुसरा तर सावगाव धरण परिसरातून तिसरा नाला आला आहे. हे तिन्ही नाले केंबाळी नाल्याला येऊन मिळतात. त्यामुळे केंबाळी नाला बेनकनहळ्ळी भागातील मोठा असून तो सुळगा येथून मार्कंडेय नदीला पोहोचलेला आहे.
‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ योजना राबविणे गरजेच
गेल्या 10 ते 12 वर्षापूर्वी ग्रामीण भागातील अनेक नाल्यांवर छोटे छोटे बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यावर पाणी अडविण्यासाठी फळ्या बसविण्याची सोय करण्यात आली आहे. ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ ही योजना नाल्यांवरील बंधाऱ्याच्या ठिकाणी सुरू आहे का? याची पाहणीही संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे.
शेती-जनावरांसाठी महत्त्वाचा नाला
12 वर्षांपूर्वी बेनकनहळ्ळी मुख्य रस्त्याच्या बाजूला छोटा बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्याच्या ठिकाणी बऱ्याच वेळेला फळ्या घालून पाणी अडविण्यात येते. याचा फायदा बेनकनहळ्ळी परिसरातील जनावरे व शेतकऱ्यांना झाला. शेतीला जोड व्यवसाय म्हणून या भागातील शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. बेनकनहळ्ळी गावातही शेतकऱ्यांकडे एक दोन गाई म्हशी आहेत. या जनावरांना चरण्यासाठी सोडल्यानंतर त्यांना केंबाळी नाल्यातील पाण्याचा उपयोग होतो, अशी माहिती काही जाणकार शेतकऱ्यांनी दिली आहे.
नाल्याच्या संवर्धनाची गरज
नाल्यामध्ये सांडपाणी येत असल्यामुळे पाणी दूषित होत आहे. सरस्वती नगर, ज्योती नगर, गणेशपूर येथील सांडपाणी या नाल्याला येऊन मिळते. सदर नाल्यात केरकचरा टाकण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. नाल्याच्या बाजूने सध्या अतिक्रमण वाढलेले आहे. नाल्यावर अतिक्रमण होत आहे. अतिक्रमण होत असलेल्या ठिकाणी तोडगा काढण्याची गरज आहे. अन्यथा बेनकनहळ्ळी मुख्य रस्त्याच्या पुलाच्या वरच्या बाजूने पावसाळ्यात शिवारात पाणी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राम पंचायतीने या नाल्याच्या संवर्धनासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
- बाबाजी देसूरकर, बेनकनहळ्ळी.
