खोटे आरोप करणे बंद करा
निवडणूक आयोगाचे काँग्रेसला प्रत्युत्तर : हरियाणा निवडणुकीवरून केले होते आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हरियाणा विधानसभा निवडणुकीत अनियमितता झाल्याच्या काँग्रेसच्या आरोपांना निवडणूक आयोगाने फेटाळले आहे. निवडणूक आयोगाने काँग्रेसचा प्रत्येक आरोप निराधार, खोटा आणि तथ्यहीन ठरविला आहे. आयोगाने काँग्रेसला पत्र लिहून दरवेळी खोटे अन् निराधार आरोप करणे बंद करण्यास सांगितले आहे. संशय निर्माण करू पाहणाऱ्या काँग्रेसवर आयोगाने टीका केली आहे.
मतदान आणि मतमोजणीसारख्या संवेदनशील काळात बेजबाबदार आरोप करणे बंद करा, असे आवाहन आयोगाने काँग्रेसला केले आहे. अशा आरोपांमुळे सार्वजनिक अशांतता आणि अराजकता निर्माण होऊ शकते असे म्हणत आयोगाने मागील एक वर्षांमधील 5 विशिष्ट प्रकरणांचा दाखला दिला आहे.
पुराव्यांशिवाय आरोप नको
कुठल्याही पुराव्यांशिवाय निवडणूक प्रक्रियेवर सवयीदाखल आरोप करणे काँग्रेसने टाळावे. काँग्रेसला दर निवडणुकीत निराधार आरोप करणे टाळण्यासाठी निर्देशित केले जात आहे. तसेच अशाप्रकारची प्रवृत्ती रोखण्यासाठी दृढ आणि ठोस पावले काँग्रेसने उचलावीत असे निवडणूक आयोगाने स्वत:च्या पत्रात नमूद केले आहे.
1600 पानांचे उत्तर
निवडणूक आयोगाने काँग्रेसला तक्रारींच्या प्रवृत्तींवर अंकुश लावण्याची सूचना केली आहे. हरियाणात निवडणूक प्रक्रियेचा प्रत्येक टप्पा ‘त्रुटीहीन’ होता असे आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाने काँग्रेसच्या तक्रारींवर 1600 पानांचे उत्तर पाठविले आहे. यात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील सामील आहेत. हरियाणा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यावर काँग्रेसने पुन्हा ईव्हीएमबद्दल संशय व्यक्त केला होता.