‘देशाची लूट बंद करा’
संसदेत विरोधकांचा आवाज बुलंद : अदानी मुद्यावरून गदारोळ सुरूच
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांचा गदारोळ सुरूच होता. लोकसभेत कामकाज सुरू होताच अदानी मुद्यावरून गदारोळ झाला. ‘देशाची लूट बंद करा’, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही अदानींवरील आरोपांचा मुद्दा गाजला. गदारोळ पाहून अध्यक्ष जगदीप धनखड यांनी ‘संसदीय वाद लोकशाही कमकुवत करतात’ अशी टिप्पणी करत विरोधकांना सुनावले. मात्र तरीही गदारोळ सुरूच राहिल्याने कामकाज तहकूब करावे लागले.
सोमवारपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ झाला असून त्यात वारंवार व्यत्यय आणण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. अदानींवरील आरोपांच्या मुद्यावरून त्यांची संसदीय समितीद्वारे चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी लावून धरली आहे. गुरुवारीही हाच मुद्दा संसदेच्या दोन्ही सभागृहात गाजला. या गदारोळामुळे सुरुवातीला दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. दुसरीकडे, लोकसभेतील वक्फ (दुरुस्ती) विधेयकावरील संयुक्त समितीचा कार्यकाळ अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 च्या शेवटच्या दिवसापर्यंत वाढवण्यात आला आहे. संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी हा प्रस्ताव लोकसभेत मांडल्यानंतर तो मंजूर झाला आहे.